For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनहास, चोप्रा, कृशन मोहन निवड समितीच्या शर्यतीत

06:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनहास  चोप्रा  कृशन मोहन निवड समितीच्या शर्यतीत
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

बीसीसीआयच्या वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती सदस्य शर्यतीमध्ये भारताचा माजी फिरकी गोलंदाज निखील चोप्रा, दिल्लीचा माजी क्रिकेटपटू मिथुन मनहास आणि विद्यमान बीसीसीआयच्या कनिष्ठ निवड समिती सदस्य कृष्णन मोहन यांचा समावेश आहे. बीसीसीआयने गेल्या जानेवारी महिन्यात 5 सदस्यांच्या निवड समितीतील रिक्त झालेल्या एका जागेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सध्या या निवड समितीमध्ये सलिल अंकोला आणि बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर पश्चिम विभागाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. उत्तर विभागाकडून सलिल अंकोला, उत्तर विभागाचे प्रतिनिधीत्व सध्या हंगामी स्वरुपात करीत आहेत. दरम्यान या निवड समिती पॅनेलमध्ये उत्तर विभागाच्या चेतन शर्माने आपल्या सदस्य पदाचा राजीनामा यापूर्वीच दिल्याने ही तात्पुरती जबाबदारी सलिल अंकोलावर सोपविण्यात आली होती पण आता या जागी नव्या सदस्याची नियुक्ती केली जाणार आहे. पंजाबचा क्रिकेटपटू कृष्णन मोहन हा 2021 च्या सप्टेंबरपासून बीसीसीआयच्या कनिष्ठ निवड समिती पॅनेलमध्ये सदस्य आहेत. भारताचा माजी यष्टीरक्षक अजय रात्राने निवड समिती सदस्यासाठी आपली उत्सुकता दर्शविली आहे. इच्छुकांकडून प्रवेश अर्जाची अंतिम मुदत 25 जानेवारीपर्यंत ठेवण्यात आली होती.

शुक्रवारपासून आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या निवड समिती पॅनेलमधील ही मोकळी जागा भरण्यासाठी मंडळाकडे अद्याप पुरेसा कालावधी आहे. अशोक मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट सल्लागार समिती असून या समितीसमोर या जागेसाठी अर्ज पाठविलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नजीकच्या काळात होतील. दिल्लीचा क्रिकेटपटू मिथून मनहासने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 157 प्रथमश्रेणी सामने खेळले असून तो 2010 ते 2014 या कालावधीत दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य होता. भारताचा माजी यष्टीरक्षक अजय रात्रा हा सध्या भारतीय अ संघाचा प्रशिक्षक असून गेल्या वर्षी त्याच्या मार्गदर्शनाखाली भारत अ संघाने द. आफ्रिकेचा दौरा केला होता. माजी फिरकी गोलंदाज निखील चोप्राने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत एकमेव कसोटी आणि 39 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. निखिल चोप्रा हा सध्या क्रिकेट समालोचन क्षेत्रात वावरत आहे. निवड समिती सदस्य अर्जासाठी काही अटी बीसीसीआयने घातल्या आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने किमान सात कसोटी किंवा 30 प्रथमश्रेणी सामने खेळले असावेत किंवा उमेदवाराला 10 वनडे किंवा 20 प्रथमश्रेणी सामन्यांचा अनुभव जरुरीचा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.