For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कांदळवन : भारतीय सागरी प्रदेशाचे सुरक्षा कवच

06:30 AM Mar 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
कांदळवन   भारतीय सागरी प्रदेशाचे सुरक्षा कवच
Advertisement

गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांतल्या किनारपट्टीला असंख्य नैसर्गिक संकटांच्या तडाख्यातून सुरक्षित ठेवण्याचे कार्य कांदळवने करत आलेली आहे. देशभरातील 7516.6 चौ.कि.मी. क्षेत्रफळातल्या सागरी किनारपट्टीचे रक्षण कांदळवनाच्या लाभलेल्या सुरक्षा कवचामुळे झालेले आहे. चक्री वादळे, महापूर यांच्या तडाख्यातून किनारपट्टीवरच्या लोकसमूहाचे रक्षण करण्याबरोबर तेथील जैविक संपदेच्या पैदासीला चालना देण्याबरोबर कांदळवनाचे क्षेत्र कर्बवायु शोषून घेण्याचे कार्य करत असतात.

Advertisement

भारतातली सागरी किनारपट्टी लाखो कुटुंबांची जीवनरेषा असून, अन्नाची रसद त्याचप्रमाणे औषधी वनस्पती, इंधन पुरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे योगदान करणारी ‘कांदळवने’ निसर्गाने प्रदान केलेले सुदृढ असे सुरक्षा कवच आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीचे संकट, आज मानवी समाजाचे जीवन नानाविविध संकटांच्या खाईत लोटत असल्याने, कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन ही महत्त्वाची बाब ठरलेली आहे. सरकारी आकडेवारीनुसार कांदळवनाच्या क्षेत्राचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ही परिस्थिती प्रतिकूल बनत चालली आहे.

2023च्या आकडेवारीनुसार कांदळवन क्षेत्राची घसरण 4991.68 चौरस किलोमीटरपर्यंत झालेली असून, गेल्या दोन वर्षांत 7.43 चौ.कि.मी. क्षेत्रफळ कमी झालेले आहे. ओडिशा राज्यात 251 चौ.कि.मी. कांदळवनाखाली क्षेत्र असून, देशाच्या तुलनेत हे प्रमाण पाच टक्के इतके आहे. देशातील सर्वाधिक कांदळवनाचे क्षेत्र पश्चिम बंगालात असून, तेथे 2112 चौ.कि.मी. म्हणजे देशातले 42.3 टक्के क्षेत्र आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या तीन नद्यांनी समृद्ध झालेल्या ‘सुंदरबनात’ले कांदळवन हे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाचे नैसर्गिक सुरक्षा कवच आहे. 140,000 हेक्टर क्षेत्रफळातल्या सुंदरबनातल्या कांदळवनाचा 1987 साली ‘युनोस्को’च्या जागतिक वारसास्थळात समावेश करण्यात आलेला आहे. सुंदरबनात स्थानिक सहभागाद्वारे पर्यावरणीय पर्यटनाचे उपक्रम राबविण्यात येत असून, संयुक्त वन व्यवस्थापनाची मोहीम यशस्वी ठरलेली आहे. सुंदरबनातल्या नानाविविध खारफुटीच्या संरक्षित प्रजातींच्या वनक्षेत्रामुळे तेथे मासे, कोळंबी, खुबे, खेकडे यांची मुबलक पैदासी होऊन, तेथील स्थानिकांचे जीवन समृद्ध आणि सुखी होण्यास हातभार लागलेला आहे. सुरक्षित कांदळवनामुळे या परिसरात दरवर्षी चक्रीवादळांच्या आणि महापुरांच्या तडाख्यापासून तेथील प्रदेशाचे संरक्षण झालेले आहे. ओडिशातही कांदळवनाचे क्षेत्र भितरकनिका अभयारण्याद्वारे सुरक्षित असल्याने 2024 साली दाना वादळाच्या तडाख्याच्या तीव्रतेपासून त्या परिसरातल्या लोकवस्तीचे रक्षण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. 1999 साली ओडिशातील जगजितसिंहपूर येथील वनक्षेत्र नसलेल्या ठिकाणी वादळाच्या तडाख्यात प्रचंड प्रमाणात नुकसानी झाल्याचे स्पष्ट झाले होते.

Advertisement

गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांतल्या किनारपट्टीला असंख्य नैसर्गिक संकटांच्या तडाख्यातून सुरक्षित ठेवण्याचे कार्य कांदळवने करत आलेली आहे. देशभरातील 7516.6 चौ.कि.मी. क्षेत्रफळातल्या सागरी किनारपट्टीचे रक्षण कांदळवनाच्या लाभलेल्या सुरक्षा कवचामुळे झालेले आहे. चक्री वादळे, महापूर यांच्या तडाख्यातून किनारपट्टीवरच्या लोकसमूहाचे रक्षण करण्याबरोबर तेथील जैविक संपदेच्या पैदासीला चालना देण्याबरोबर कांदळवनाचे क्षेत्र कर्बवायु शोषून घेण्याचे कार्य करत असतात. परंतु असे असताना, कांदळवनाची तोड मोठ्या प्रमाणात वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकरणाच्या विस्तारासाठी चालू असून, बऱ्याच ठिकाणी कोळंबी पैदासीसाठी या क्षेत्रावर घाला घातला जात आहे. तेल गळती, सांडपाणी, मल-मूत्र विसर्जन यामुळे प्रदूषण वाढत असून प्लास्टिक आणि अन्य प्रकारच्या कचऱ्याच्या गैरव्यवस्थापनामुळे कांदळवनाच्या अस्तित्वाला सुऊंग लावले जात आहेत. अंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्वीप येथील प्रदेशात विकासाच्या नावाखाली जे प्रकल्प आततायीपणे तसेच पर्यावरणीय नियमांची पायमल्ली करून राबविले जात आहेत, त्यामुळे येथील जैविक संपदा आणि आदिवासी जमातींचे जगणे व उदरनिर्वाहाची साधने संकटांच्या खाईत लोटली जात आहेत.

गोव्यासारख्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या राज्याला हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीच्या संकटांचे भय सातत्याने समोर उभे ठाकलेले असताना, त्याच्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करून सागरी नियमन क्षेत्राच्या अस्तित्वाला आव्हान देऊन कांदळवनाचे क्षेत्र उद्ध्वस्त केले जात आहे. मुंबई-ठाणे या भागातही बंगले, इमारतीसाठी जागा मिळणे दुरापास्त ठरल्याने, आता बांधकाम क्षेत्रातल्या व्यावसायिकांची वक्रदृष्टी कांदळ वनक्षेत्राकडे वळलेली आहे. सागरी नियमन क्षेत्राद्वारे कायदेशीररित्या संरक्षण लाभलेल्या या सदाहरित वनाचे अस्तित्व मानवी समाजाबरोबर अन्य सजीवमात्रांसाठी आश्रयस्थान ठरलेले असताना, त्याच्यावरती घातला जाणारा घाला, धोकादायक असाच आहे.

गोव्यात एकेकाळी चोडण येथील डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्यात नानाविविध खारफुटीच्या प्रजातींचे रक्षण करण्यात आल्याने ते देशी-विदेशी पक्ष्यांसाठी नंदनवन ठरले होते आणि त्यासाठी पक्षी निरीक्षकांची पावले मोठ्या आशेने इथे वळायची. महाराष्ट्रातील वेंगुर्ला येथील कांदळवनात स्वामिनी हुले आणि त्यांच्या स्वयंसाहाय्य गटातल्या महिलांनी पर्यावरणीय पर्यटनाचा प्रकल्प यशस्वी केलेला आहे. कोकणातल्या आचऱ्याच्या खाडीतील कांदळवनाची होडीतील पक्षी आणि जैविक संपदेची निरीक्षण सफर निसर्ग प्रेमींसाठी सुख-सोहळा ठरत आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यातल्या सागरी किनाऱ्यावरच्या कांदळवनातले शाश्वतरित्या चालणारे पर्यावरणीय पर्यटन देश-विदेशातल्या पर्यटकांसाठी आकर्षण बिंदू ठरत आहे. कांदळवनाचे संवर्धन तथा संरक्षण करण्यासाठी जेव्हा स्थानिक लोकांना सहभागी करून घेतले जाईल आणि शाश्वतरित्या नियोजनबद्ध पर्यावरणीय पर्यटनाचे उपक्रम राबविले जातील, तेव्हाच खरा-खुरा विकास होणे शक्य आहे. कांदळवनात आपल्या पूर्वजांना ज्याप्रमाणे पशु-पक्षी यांचे वास्तव्य भावले, त्याचप्रमाणे तेथेच अदृश्य शक्तीच्या पाऊलखुणांची प्रचिती आली आणि त्यामुळे त्याच्या अस्तित्वाची दखल घेत, त्यांनी आपले जीवन सुखी आणि समृद्ध केले होते. आज हेच रेशमी अनुबंध राखणे आवश्यक आहे.

- प्रा. राजेंद्र केरकर

Advertisement
Tags :

.