For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खारफुटीचे जंगल भारताचे सुरक्षा कवच

06:30 AM Apr 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
खारफुटीचे जंगल भारताचे सुरक्षा कवच
Advertisement

खारफुटीच्या जंगलामुळे इतर वनस्पती व अन्य जैविक संपदेच्या घटकांचे रक्षण होण्यास मदत होते. त्याठिकाणी वास्तव्य करणाऱ्या जलचरांचे संरक्षण होते. मासे, खेकडे, झिंगे आणि अन्य जलचर प्राणी या वृक्षांच्या सान्निध्यात अंडी घालतात आणि तेथे त्यांची सुरक्षितरित्या पैदासी होते. खारफुटीच्या वनस्पतींची मुळे आणि पाने यांच्यामध्ये सागराच्या पाण्यातील क्षारता सहन करण्याची क्षमता असून, जमिनीची धूप रोखण्याबरोबर वादळ-वाऱ्यापासून किनारपट्टीवरच्या भूमीचे रक्षण करण्याचे कार्य करीत असते.

Advertisement

उष्ण कटिबंधातील सागर किनाऱ्यावरच्या लाटांचा प्रभाव असणाऱ्या भारतातील दलदलयुक्त आणि नद्यांच्या मुखाजवळ आढळणारे खारफुटीचे सधन जंगल तेथील सदाहरित वृक्ष आणि झुडुपांनी समृद्ध असणे, ही किनारपट्टीवरच्या प्रदेशाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. सागराच्या भरतीच्या पाण्याच्या पातळीपासून ते ओहोटीच्या पाण्याच्या पातळीपर्यंतच्या क्षेत्रात खारफुटीचे हे जंगल भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आणि पश्चिम बंगालच्या सुंदरबनमध्ये प्रामुख्याने खारफुटीचे हे जंगल आढळते. खारफुटीच्या जंगलातील विविध तऱ्हेच्या वृक्षांची मुळे व फांद्या जाळीदार विकसित होत असल्याने समुद्राच्या पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ व लाकडे अडकून ही जंगले तेथे प्रबळ मृदायुक्त नैसर्गिक बांध निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान करतात. खारफुटीच्या नानाविध प्रजातींनी समृद्ध जंगल खरेतर सागर व जमीन तसेच खाडी, किनारा व तेथील भूमी यांच्यात एक हिरवाईने नटलेली नैसर्गिक भिंत निर्माण करते आणि त्यामुळे तेथील किनारपट्टीजवळच्या जमिनीची पाण्याच्या लाटांच्या तडाख्यामुळे होणारी धूप नियंत्रित होते.

खारफुटीच्या जंगलामुळे इतर वनस्पती व अन्य जैविक संपदेच्या घटकांचे रक्षण होण्यास मदत होते. त्याठिकाणी वास्तव्य करणाऱ्या जलचरांचे संरक्षण होते. मासे, खेकडे, झिंगे आणि अन्य जलचर प्राणी या वृक्षांच्या सान्निध्यात अंडी घालतात आणि तेथे त्यांची सुरक्षितरित्या पैदासी होते. खारफुटीच्या वनस्पतींची मुळे आणि पाने यांच्यामध्ये सागराच्या पाण्यातील क्षारता सहन करण्याची क्षमता असून, जमिनीची धूप रोखण्याबरोबर वादळ-वाऱ्यापासून किनारपट्टीवरच्या भूमीचे रक्षण करण्याचे कार्य करीत असते. खेकडे आणि अन्य प्रकारच्या कवचधारी मृदूकाय जीवांच्या प्रजननासाठी खारफुटीचे जंगल जागा उपलब्ध करून देते. नदी-नाल्याचे पाणी जेव्हा सागराकडे वळते, त्यावेळी त्या पाण्यात नाना प्रकारची प्रदुषके मिसळतात, अशावेळी ही प्रदुषके आणि अतिरिक्त पोषक घटक गाळण्याच्या दृष्टीने खारफुटीचे वन उपयुक्त ठरत असते.

Advertisement

गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकाच्या किनारपट्टीच्या प्रदेशाला शेकडो वर्षांपासून खारफुटीची जंगले वादळवारे, महापूर, भूकंप आदी नैसर्गिक प्रकोपापासून संरक्षण देत असल्याकारणाने निसर्गाने आपणाला जे सुरक्षा कवच दिलेले आहे, त्याचे संरक्षण करण्यासाठी आपल्या सरकारी यंत्रणेने स्थानिक जनतेच्या सहकार्याने मोहीम राबविण्याची नितांत गरज आहे. परंतु असे असताना सागरी पर्यटनाला चालना देण्याच्या आततायीपणापायी आम्ही खारफुटीच्या जगंलातल्या वृक्षसंपदेची मोठ्या प्रमाणात कत्तल करून आणि मातीचे भराव टाकून अशा दलदलीतही बांधकामे उभारण्याला चालना देत आहोत. गोव्यासारख्या छोटेखानी राज्यात तर पणजी, मडगाव आणि अन्य किनारपट्टी गावांत सागरी पर्यटन व्यवसायाची हॉटेल्स, बंगले आणि अन्य साधनसुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने खारफुटीच्या जंगलांनी युक्त दलदलीचे प्रदेश मातीचे भराव टाकून दिवसाढवळ्या बुजविले जात आहेत. महामार्ग, रेल्वेमार्ग यांचा विस्तार करण्यासाठी खारफुटीचे वनक्षेत्र नष्ट करण्याचे प्रकार गेवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाहायला मिळत आहेत.

2024 मध्ये जेव्हा ओडिशात दाना वादळाचा तडाखा बसला होता, तेव्हा राजनगर खारफुटी वनक्षेत्राच्या परिसरात येणाऱ्या लोकवस्तीने युक्त प्रदेशाचे रक्षण झाल्याचे उघडकीस आले होते. बंगालच्या उपसागरातून निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या झंझावातापासून यापूर्वी बऱ्याचदा जेथे जेथे खारफुटीचे वनक्षेत्र सुरक्षित होते, तेथे मनुष्यहानी, मालमत्तेचे नुकसान कमी प्रमाणात झाल्याचे प्रकाशात आले होते. ओडिशात 231 चौ.कि.मी. खारफुटीच्या वनाला राखीव जंगल क्षेत्राचा दर्जा लाभलेला असून, वेळोवेळी आलेल्या वादळाच्या तडाख्यापासून भितरकनिका राष्ट्रीय उद्यानाच्या परिघातील गावे, लोकवस्ती सुरक्षित राहिलेली आहे. भितरकनिका उद्यानात, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खारफुटीच्या जंगलांनी समृद्ध पर्यावरणीय परिसंस्था आहे. हे खाऱ्या पाण्यातील मगरीचे प्रजननाचे आणि ऑलिव्ह रिडले समुद्री कासवासाठी नैसर्गिक अधिवास ठरलेला आहे. आठ प्रकारच्या धीवर पक्षाच्या प्रजातीबरोबर असंख्य पक्षांची घरटी या खारफुटीच्या वनक्षेत्रात आहेत.

आज विकासाच्या नावाखाली जे प्रकल्प हाती घेतले जात आहेत, त्यामुळे डिसेंबर 2024 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अहवालानुसार देशभरातील जंगलक्षेत्र गेल्या दोन वर्षांच्या काळात 1445.81 चौरस किलोमीटरने वाढले असल्याचे स्पष्ट झालेले असले तरी खारफुटीचे 7.43 चौ.कि.मी. वनक्षेत्र नष्ट झालेले आहे. गुजरात राज्यात खारफुटीचे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आलेले आहे. भारतातील खारफुटीचे जंगल जैविक संपदेचे आगर असून, 4,107 प्राणी आणि वनस्पतीच्या प्रजातींचे आश्रयस्थान असल्याचे स्पष्ट झालेले आहे. भारतातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी, अंदमान आणि निकोबार त्याचप्रमाणे लक्षद्विपमध्ये खारफुटीची जंगले पर्यावरण तसेच तेथील लोकजीवनासाठी महत्त्वाचा आधार ठरलेला आहे. अंदमान आणि निकोबार त्याचप्रमाणे सुंदरबन येथे भारतातील सधन आणि समृद्ध खारफुटीचे जंगल असून तेथील लोकजीवनासाठी त्याचा महत्त्वाचा आधार ठरलेला आहे.

भारतात 4992 चौ.कि.मी. खारफुटीचे जंगल असून, आपल्या देशातला केवळ 0.15 टक्के भूभागच खारफुटींनी व्यापलेला आहे. भारतीय वन संवर्धन कायदा 1980, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 त्याचप्रमाणे किनारपट्टी नियमन क्षेत्र अधिसूचनेद्वारे खारफुटीच्या वनक्षेत्राला कायदेशीर संरक्षण लाभलेले आहे. परंतु असे असताना, आज बऱ्याच ठिकाणी खारफुटीची निर्धोकपणे कत्तल केली जात असल्याचे उघडकीस आलेले आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीच्या संकटावर मात करण्यासाठी खारफुटीच्या जंगलाचे संवर्धन आणि संरक्षण महत्त्वाचे असल्याची जाणीव तामिळनाडूसारख्या राज्याला झाल्याने आणि त्सुनामीवेळी निर्माण झालेली परिस्थिती ध्यानात धरून, खारफुटीचे वनक्षेत्र वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध पावले उचलली आणि त्यामुळे 2021 साली 4500 हेक्टरात असलेल्या खारफुटीच्या वनक्षेत्रात वाढ होऊन 2024 साली ती 9,039 हेक्टर झालेली आहे. किनारपट्टीवरच्या प्रत्येक राज्यांनी आणि प्रदेशांनी खारफुटीच्या वनक्षेत्राचे संवर्धन आणि संरक्षण केले तरच तेथील लोकजीवन सुखी होईल.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.