Pandharpur | पंढरपुरात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्यांचा गोडवा; कोकणच्या हापूसला वाढती मागणी
पंढरपुरात अक्षय्य तृतीयेला आंब्यांचा बाजार फुलला
पंढरपूर -शहरात साडे तीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर कोकण तसेच इतर भागातून मोठ्या प्रमाणात हापूस आंबा व इतर रसाचे आंबे दाखल झाले आहेत. यंदा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने कोकणात मोठ्या प्रमाणात मोहोर गळून गेला असल्याने हापूस आंब्याच्या दरात १० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे.सध्या अमेरिका, इराण व इस्त्राईल देशात युद्ध सुरूअसल्याने भारतातून होणारी आंबा निर्यात ठप्प झाली आहे.
आंब्यासाठी कोकण वारी !
पंढरपूर येथे अशी अनेक घराणी आहेत. जी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरच आंचा खरेदी करतात. या अगोदर आंबा खरेदी करीत नाहीत. तर अनेक खवय्या रसिक केवळ कोकणातील अस्सल हापूस आंब्याची खरेदी करतात. काही दर्दी लोक खास कोकणात जाऊन कार किंवा जीपमधून हापूस आंबा पंढरपूर येथे घेऊन येतात.
आंब्याचे दर अजून वाढलेले दिसले असते. कोकणातील हापूस बरोबरच बऱ्याच ठिकाणी कर्नाटक हापूस आंबा आला आहे. आंब्याचे दर कोकणातील हापूस आंब्यापेक्षा निम्म्याने कमी आहेत. सोलापूर जिल्ह्यातील केशर आंबा आलेला असून स्वस्तात मस्त, असा हा आंबा असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबातील ग्राहक केशर, लालबाग, पायरी, बदाम, देशी आंब्यांना पसंती देत आहेत.
सणांमुळे आंब्यांची मागणी वाढली
देवगड हापूस आंबा १२०० ते १५०० रुपये डझन असा आहे. रत्नागिरी हापूस १ हजार ते तेराशे, मालवण हापूस ८०० ते ११०० रुपये डझन, कर्नाटक हापूस ५०० रुपये डान, केशर आंबा १५० ते २०० रुपये डझन, लालबाग २०० ते २५०, पायरी २०० ते २५०, बदाम १५० ते २०० डझन असा दर दिसून येत आहे. अक्षय्य तृतीयापासूनच आंबा खरेदीला सुरूवात होते. त्यामुळे सणाच्या मुहूर्तावर हापूस आणि इतर आंब्यांना मागणी वाढली होती. आसिफ बागवान, आंबा विक्रेते, पंढरपूर