बदलत्या वातावरणाच्या चक्रव्यूहात आंबा बागायतदार
सततच्या बदलत्या वातावरणामुळे कोकणातील फळपिकांना गेल्या काही वर्षांपासून मोठा फटका बसत आहे. कोकणातील आंब्याला यंदा विक्रमी मोहोर आला होता. मात्र तो टिकण्याऐवजी काळवंडला आहे. काजू पिकाचीही तीच परिस्थिती असून फळधारणा प्रक्रिया ठप्प झाल्याने यावर्षी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. रसायनांच्या अनेक फवारण्या करूनही निसर्गापुढे बागायतदार हतबल होऊन बदलत्या वातावरणाच्या चक्रव्यूहात आंबा व काजू बागायतदार अडकले आहेत. हतबल ठरलेल्या बागायतदारांनी आंबा पिकाला हमी भाव द्यावा, संशोधन व्हावे, अशा मागण्या केल्या आहेत.
कोकणातील आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात 70 टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात 20 टक्के मोहोर आला. परंतु हा सर्व मोहोर अतिथंडी, ढगाळ वातावरण प्रचंड धुके यामुळे अक्षरश: करपला आहे. त्यामुळे 90 टक्के मोहोर आला असला, तरी 10 टक्केही फळधारणा न झाल्यामुळे लाखो रुपये खते, कीटकनाशक, बुरशीनाशकांवर खर्च केलेले आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. आत्ता बागायतदारांना तिसऱ्या टप्प्यातील मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून रहावे लागणार आहे. परंतु ते उत्पादन आले, तरी फारच अल्प प्रमाण असणार आहे. आंबा पिकाप्रमाणे सततच्या धुक्याचा परिणाम काजू पिकावरही झाला असून मोहोर करपल्याने कोकणात काजू पिकाचेही 25 टक्केच उत्पादन मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे काजू बागायतदार शेतकरीही हवालदिल झाले आहेत.
कोकणातील फळ पिकांना गेल्या काही वर्षांपासून मोठा फटका बसत आहे. आंबा पीक तर गेली काही वर्षे सतत बदलत्या वातावरणाच्या चक्रव्यूहात अडकल्याचे चित्र आहे. कोकणात यावर्षी पाऊस लांबला. त्यामुळे आंबा हंगाम लांबणार असा सुरुवातीचा अंदाज होता. परंतु, 15 नोव्हेंबरनंतर थंडीची चाहूल सुरु झाली. नोव्हेंबरअखेरपर्यंत थंडीचा कडाका खूपच वाढला. ही थंडी सुरुवातीला सर्वांनाच हवीहवीशी वाटू लागली. थंडीचे सकारात्मक परिणामदेखील बागायतीमध्ये दिसू लागले. नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत कोकणातील 70 टक्के झाडांना मोहोर आला. त्यानंतरच्या दहा-पंधरा दिवसात उर्वरित 20 टक्के झाडेदेखील मोहोराने बहरली.
आंब्याच्या झाडावर पानांपेक्षा मोहोर अधिक असल्यामुळे बागायतदारांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली थंडी जानेवारी अखेरपर्यंत कायम राहिली. अनेक दिवस 13 अंश सेल्शिअसपेक्षा कमी तापमान राहिले. त्यानंतर 15 फेब्रुवारीपर्यंतचे वातावरण पाहिल्यास रात्री थंडी आणि दिवसा कडक उन पडत आहे. या सर्वांचा परिणाम आंबा पिकावर झाला. मोहोराचे रुपांतर फळधारणेत झाले नाही. नर फुलांचे प्रमाण वाढले. तुलनेने मादी फुलांचे प्रमाण अत्यल्प राहिले. थंडीमुळे अपेक्षित परागीकरण झाले नाही. त्यातच 12 जानेवारीच्या दरम्यान कोकणात ढगाळ वातावरण निर्माण झाले. याशिवाय सतत धुक्याचे प्रमाण देखील वाढले. याचा एकंदरीत परिणाम आता आंबा बागांवर दिसून येऊ लागला आहे.
मोहोराने बहरलेल्या आंबा बागा आता काळवंडल्या आहेत. मोहोर अक्षरक्ष: करपला आहे. 90 टक्के मोहोरलेल्या आंब्याला 10 टक्केदेखील फळधारणा झालेली नाही. त्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारण्या झाडांवर केल्या आहेत. याशिवाय कित्येक मजूर बागांमध्ये कामाला आहेत. दहा टक्के आंबा उत्पादनात उत्पादन खर्चदेखील भागण्याची शक्यता कमी आहे. तिसऱ्या टप्प्यात मोहोर फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु, त्यावर देखील फूलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार सर्व बाजूंनी अडचणीत आला आहे.
कोकणात आंबा मोहोर करपल्यानंतर आता काजूचा मोहोरदेखील करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काजू उत्पादकदेखील हवालदिल झाले आहेत. सततच्या धुक्याचा हा परिणाम मानला जात आहे. मोहोर करपल्याने कोकणात केवळ 25 टक्केच काजूचे उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. आंब्याप्रमाणे काजूचा मोहोर टिकविण्यासाठी कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या, मात्र तरीही मोहोर करपल्यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत. कोवळी बीदेखील काळवंडत आहे. कोकणातील काजू उत्पादक आर्थिक संकटात आहे. आंबा पीक कोकणच्या किनारपट्टी आणि काही भागात आहे. मात्र काजू पीक कोकणातील सर्वच तालुक्यात आहे. हजारो हेक्टर क्षेत्रात काजू पिकाची लागवड केलेली आहे, मात्र आंब्याप्रमाणे काजू पिकावरही वातावरणाचा परिणाम होऊन उत्पादन घटणार असल्याने कोकणच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे.
अनेक शेतकऱ्यांनी चार-चार फवारण्या केल्या आहेत, लाखो ऊपये शेतकऱ्यांनी खर्च केले आहेत. त्यात काजू उत्पादनच मिळाले नाही, तर खर्च वसुली होणार कशी? काढलेले कर्ज फेडणार कसे? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत. काजू बागायतदार शेतकरी अक्षरश: अडचणीत सापडला आहे. धुक्यामुळे मोहोर करपत आहे, तर दुसरीकडे काजू-बी पोखरणारी अळी, फुलकिड्यांचा प्रादुर्भाव असून त्यामुळे काजू पिकातदेखील वीस ते पंचवीस टक्केच उत्पादनाचा अंदाज आहे.
ढगाळ वातावरणाने निर्माण होणाऱ्या बुरशीवर बुरशीनाशक, कीटकनाशकाचा उपयोग होतो. काही प्रमाणात कीड नियंत्रणही होते. मात्र सततच्या धुक्यामुळे करपत असलेल्या मोहोर नियंत्रणासाठी कोणतेही उपाय सध्या तरी अस्तित्वात नसल्याचे कृषी तज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे अशा स्थितीत नेमके काय करावे, हेच शेतकऱ्यांना सुचेनासे होऊन शेतकरी निसर्गापुढे हतबल झाला आहे. आंबा व काजू पिकांवर आलेले या वेळेचे संकट सर्वार्थाने वेगळे आहे. ऐन भरात असलेला हंगाम अचानक उद्ध्वस्त झाला. याचे कारण नेमके काय आहे हे बागायतदारांना समजण्याच्या पलीकडे गेले आहे. अनियंत्रित कीड रोग आणि बदलते वातावरण हे मुख्य कारण असले, तरी प्रत्यक्ष नुकसानीचे स्वरुप खूप गंभीर आहे. त्यामुळे यामागचे आणखी कोणते कारण तर नाही ना! असा प्रश्न बागायतदारांना अस्वस्थ करीत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना भविष्यात अशा संकटांचा सामना करण्यासाठी बदललेल्या वातावरणावरदेखील मात करून फळधारणा कशी टिकवून ठेवता येईल, यावर संशोधन होण्याची फार आवश्यकता आहे.
आंबा बागायतदारांना सतत वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याने आंबा पिकाला हमीभाव मिळावा, ही प्रमुख मागणी होत आहे. शिवाय स्थानिक पातळीवर आंबा विकला जावा, मार्केट यार्ड व्हावे, आंबा पिकावरील रोगांचे संशोधन व्हावे, अद्ययावत प्रयोगशाळा असावी, बदलत्या हवामानाचे शेतकऱ्यांना वेळीच कल्पना मिळून आंबा पीक वाचविण्यासाठी मार्गदर्शन व्हायला हवे, आंबा काजू प्रक्रिया उद्योग उद्योगांसाठी कमी व्याज दराने कर्ज पुरवठा व्हावा अशा अनेक मागण्या पुढे आल्या आहेत. सद्यस्थिती पाहता यावर्षी आंबा व काजू पिकाचे उत्पादन फारच कमी राहणार असल्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम कोकणाच्या अर्थकारणावर होणारच आहे, पण शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी आंबा व काजू पिकाचे सर्वेक्षण होऊन नुकसान भरपाईसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत आणि शासनाकडून आंबा व काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासनाकडून प्रयत्न व्हायला हवेत.
संदीप गावडे