For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कला अकादमी संकुलात आज, उद्या आंबा महोत्सव

12:38 PM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
कला अकादमी संकुलात आज  उद्या आंबा महोत्सव
Advertisement

मुख्यमंत्र्यांच्याहस्ते आज उद्घाटन : विविध प्रकारच्या आंब्यांचे प्रदर्शन

Advertisement

पणजी : गोवा कृषी संचालनालयातर्फे  शुक्रवार दि. 17 आणि दि. 18 रोजी असे दोन दिवस कला अकादमी संकुलात ‘मँगो शो’ म्हणजेच आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात विविध जातींच्या आंब्यांची लागवड करण्यात येते परंतु त्या जाती सर्वांनाच ओळखता येत नाहीत. महोत्सवांतून या जातींची प्रत्येकाला ओळख करून देणे, त्यांची देखभाल करणे, अधिकाधिक क्षेत्र आंबा लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे व त्याद्वारे दर्जेदार आंब्यांचे पीक घेणे आणि महत्त्वाचे म्हणजे उत्पादित आंब्याला बाजारपेठ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त फायदा मिळवून देणे हा महोत्सवाचा उद्देश आहे. या आंबा महोत्सवात राज्यात उत्पादित होणाऱ्या विविध प्रकारच्या आंब्यांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. त्यात  माल्कोराडो, हापूस, बार्देश मुसरद, सालसेत मुसरद,  फर्नांडिन, फुर्ताडो, कोलाको, कार्डोजो मानकुराद, हिलारियो, मालगेश, झेवियर, केसर, निलम, तोतापुरी, अमरपल्ली, रत्ना, सिंधू, मल्लिका अशा गोमंतकीय व भारतीय सुमारे 40 आंब्याच्या जातींचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. केंट आणि टॉमटकिन्स यासारख्या विदेशी जाती देखील यात प्रदर्शित केल्या जातील.

मँगो शोमध्ये आंब्याच्या विविधतेचा आस्वाद घेण्याची संधी आंबाप्रेमींना मिळणार आहे.  या कार्यक्रमात आंब्याच्या जातींसोबतच गोव्याच्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 25 हून अधिक विविध मूल्यवर्धित आंबा उत्पादनांचे आकर्षक प्रदर्शनही दाखवले जाईल. मँगो शो हे ओळख आणि कौतुकाचे व्यासपीठ असेल, कारण प्रत्येक जातीचे उत्कृष्ट आंबे आणि अपवादात्मक आंबा मूल्यवर्धित उत्पादनांना रोख बक्षिसे आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. आंब्याच्या विविध जाती-प्रजाती प्रदर्शित करण्यासाठी 1000हून अधिक  प्रवेशिका आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या 300 नोंदी या आंबा शोमध्ये सहभागी होणार आहेत आणि बक्षिसे मिळविण्याच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्याशिवाय तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा प्रात्यक्षिके, परिषद, चर्चासत्रे, स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात येणार आहे. आंबा महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते आज शुक्रवार दि. 17 रोजी सायंकाळी 4 वा.  कला अकादमीत होणार आहे. यावेळी कृषिमंत्री रवी नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित असतील. सदर महोत्सव आज शुक्रवार दि. 17 रोजी सायंकाळी 4 ते 6.30 वाजेपर्यंत व शनिवारी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.