For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाढते तापमान, पावसामुळे आंबा, काजू पीक धोक्यात

06:46 AM Apr 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
वाढते तापमान  पावसामुळे आंबा  काजू पीक धोक्यात
Advertisement

कोकणचे अर्थकारण आंबा पिकावर अवलंबून आहे. मात्र हेच आंबा पिक उष्णतेमुळे धोक्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ होऊन ते सुमारे 40 अंशापर्यंत पोहोचले आहे. त्याचा आंबा, काजू व इतर फळपिकांवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. आधीच विविध कारणांमुळे आंबा, काजू बागायतदारांच्या उत्पन्न व खर्चाचे गणित बिघडलेले असताना आता तापमान वाढ आणि अवकाळी पावसाने होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे चटकेही बागायतदारांना बसत आहेत. त्यामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत सापडले आहेत.

Advertisement

बदलत्या हवामानात अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे फळगळ वाढत आहे. बाजारभाव आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच आंब्याच्या उत्पादनावर परराज्यातून होणारे अतिक्रमण, उत्पादनावर होणारा खर्च आणि फवारणीचा खर्च वाढत आहे. ज्यामुळे आर्थिक गणित बिघडते आहे. काही शेतकऱ्यांनी आंबा झाडे भाड्याने दिली आहेत, त्यांनाही नुकसानीचा सामना करावा लागतोय.

काजूच्या कोवळ्या बिया वाऱ्यामुळे गळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी बदलते हवामान आणि इतर समस्यांमुळे चिंतीत आहेत. हवामानातील बदल, फळगळ आणि बाजारभावातील चढ-उतार यासारख्या समस्यांमुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून फळपिक विम्याची भरपाई मिळावी, यासाठी मागणी केली जात आहे.

Advertisement

हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे यावर्षी कोकणातील आंबा, काजू व इतर फळपिके या सर्वच फळपिकांवर परिणाम जाणवत आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाळा असतो. नोव्हेंबर, डिसेंबर आणि अगदी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत थंडी असते. परंतु यावर्षी थंडी गायब होती. पुरेसा आणि आवश्यक असणारा थंडीचा हंगाम होऊ न शकल्याने त्याचा मोहरावर परिणाम झाला. आंब्याला मोहर येण्यासाठी भरपूर कडाक्याची थंडी झाली तरंच आंबा, काजू मोहरतो आणि बहरतोही. परंतु यावर्षी थंडी न झाल्याने आंब्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. फक्त 30-40 टक्केच आंबा पीक आल्याचे बागायतदार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा बागायती मोठ्या प्रमाणावर आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीला जशी आंबा लागवड आहे तशाच आंबा बागायती दोन्ही जिल्ह्यांच्या मधल्या भागांमध्येही आहेत. गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही सतत हवामान बदलत गेले. अवकाळी पाऊस तर अधून-मधून सुरूच असतो.

कोकणातील शेतकऱ्यांचे आंबा, काजू बागायतींवरच वार्षिक आर्थिक गणित अवलंबून असते. वर्षभर काजू, कलम बागायतीच्या निगराणीसाठी करण्यात आलेला खर्च, वारंवार करावी लागणारी फवारणी या सर्वांचा आर्थिक ताळमेळ फारसा कुठे जमतो, असे नाही. त्यातच आंबा किंवा काजू या दोन्हींच्या बाबतीत परराज्यातून अतिक्रमण सुरुच आहे. कोकणातील आंबा म्हणजे देवगड, रत्नागिरी हापूस हे ब्रॅण्ड आहेत; परंतु कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आंबा रत्नागिरी-सिंधुदुर्ग हापूस म्हणून राजरोसपणे मोठ्या मार्केटमध्ये विकला जातो. असे असूनही कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी आपल्या हापूस आंब्यावर होणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीत चिंतेत नाहीत. आजही कोकणातील देवगड, रत्नागिरीचा हापूस सर्वांना आवडतो. साता समुद्रापार कोकणचा हापूस जातो, याच आनंदी विचारात बागायतदार शेतकरी मश्गुल आहे. परंतु, गेल्या तीस-चाळीस वर्षांत जग बदललंय. मार्केटमध्ये बदल झाले आहेत. याचा साधा विचारही केला जात नाही. तो शेतकऱ्याने करायला हवा. बदलत्या हवामानामुळे आंबा व काजू पिकांवर होणाऱ्या परिणामावर संशोधन व्हायला हवे आणि त्यावर उपाययोजना करायला हवी, ती होत नाही. राजकारणी लोकांकडूनही हवे तसे आंबा, काजू पिकाच्या समस्यांकडे बघितले जात नाही.

शेवटी आंबा बागायतदारांनी आपले हित कशात आहे, फायदा कशात आहे, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आंबा, काजू व इतर पिके ही सर्वच पूर्णत: हवामानावर, अर्थात निसर्गावर अवलंबून आहेत. निसर्गाचे चक्र बिघडले की, त्याचा परिणाम या सर्वांवर झालेला दिसून येतो. आंबा पीक गतवर्षीही फारच कमी प्रमाणात आले होते. काजू बागायतीच्या बाबतीतही वेगळी स्थिती नाही. आंब्याला यावर्षी पालवी फुटल्यामुळे मोहर गायब झाला. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी आंबा पीक हे 30-40 टक्केच झाले आहे. यातही आता उष्णता वाढतच आहे. अवकाळी पाऊसही अधूनमधून सुरु आहे व त्याचे दुष्परिणाम आंबा पिकावर झालेले दिसत आहेत. आंबा बागायतीत सर्वत्र पालवी दिसते. अनेक आंबा बागायतीत फळधारणा होऊच शकली नाही. कडाक्याच्या थंडीनंतर येणारी फूट आलीच नाही. पालवी फुटल्याने मोहर आला नाही. काजू बागायतीत तर टी-मॉसकिटोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. काजू बागायतीतही पारंपरिक जुन्या वडिलोपार्जित काजू बागायती त्यांच्या-त्यांच्या आलटून-पालटून येतात. गेल्या काही वर्षांत कोकण कृषी विद्यापीठात काजूचे संशोधन करून वेंगुर्ले-4, वेंगुर्ले-7 अशा नव-नवीन काजू जातीची लागवड सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाली आहे. कोकण कृषी विद्यापीठ आंब्याच्या बाबतीत फार काही करू शकले नाही, तरीही काजूच्या बाबतीत मात्र कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन केले आहे. वेंगुर्ले-4 या जातीची काजू ‘बी’ ही आकाराने छोटी आहे, तर वेंगुर्ले-7 या काजू जातीची बी ही आकाराने मोठी आहे. मार्केटमध्ये या मोठ्या काजू ‘बी’ला मोठी मागणी आहे, परंतु यावर्षी कोकणात काजू बागायतीत टी-मॉसकिटोचा प्रादुर्भाव जवळपास सर्वत्रच झाला आहे. काजू बागायतदार शेतकऱ्यांनी चार-पाचवेळा फवारणी केल्यावरही त्याचा परिणाम जाणवत नाही. यामुळे फवारणीवर होणारा दामदुप्पटचा खर्च बागायतदाराचे कर्ज वाढविणारा ठरला आहे.

गेल्या काही वर्षांत काजू बागायतदार शेतकऱ्यांनी ओले काजू विक्रीच्या व्यवसायात अधिक लक्ष केंद्रित केले. साहजिकच कोकणात एखाद्याने एखादा व्यवसाय सुरू केला की, सर्वांकडूनच त्याची ‘री’ ओढली जाते. तसेच काहीसे गतवर्षी या काजू ‘बी’च्या बाबतीत घडले. ओले काजू एकाच वेळी काही कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आले की, परिणामी भावही खाली आला. त्यामुळे काजू बागायतदार शेतकऱ्यांना फार फायदा होऊ शकला नाही. या वर्षीही काजू ‘बी’ उत्पादन कमी आहे. वेंगुर्ले-4 नंबर काजू आतून खराब होत आहे. कोकणातील काजू बागायतदार, आंबा बागायतदार व्यावसायिक हे आर्थिक संकटात आहेत.

महाराष्ट्रातील शेतकरी बागायतदाराला जशी राज्य सरकार मदत करते, त्याच धर्तीवर कोकणातील काजू, आंबा, सुपारी, नारळ बागायतदारालाही मदतीचा हात मिळायला हवा. काजू-बीला हमीभाव मिळत नाही. शासनाने गतवर्षीपासून किलोमागे दहा ऊपये अनुदान देण्यास सुऊ केले, पण ते फारच अल्प आहे. ते 50 ऊपयापर्यंत वाढवायला हवे. तरच काजू पिकावर होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ बसेल. आगामी काळात काजू व आंबा बागायतदार शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. ही संकटे परतवून लावण्याची तयारी केली पाहिजे.

कोकणातील बदलते वातावरण हापूससाठी यापुढे धोकादायक आणि चिंतेची बाब ठरु शकते. कोकण म्हटल्यावर आल्हाददायक वातावरण अशीच काहीशी ओळख आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, मुबलक पाऊस, अंगाला झेंबणारी थंडी आणि सोसवेल एवढा उन्हाळा असेच वातावरण असायचे. मात्र अलीकडील काही वर्षांत विकासाच्या नावाखाली झालेली प्रचंड वृक्षतोड, घरांची बदलती संकल्पना, रस्त्यांचे काँक्रीटीकरण यामुळे उष्णतेत बेसुमार वाढ झाली आहे. त्यामुळे आंबा, काजूसारख्या फळ पिकांसाठी पोषक वातावरण बदलत चालले असून भविष्यात या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तरच कोकणातील आंबा, काजू व इतर फळपिके चांगल्या वातावरणात तयार होतील आणि कोकणची आर्थिक घडी विस्कटणार नाही.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.