मंगेश मोटर्सच्या मारुती सुझुकी अरिना शोरूमचे थाटात उद्घाटन
पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांची उपस्थिती : कॅम्प येथे नवी शोरूम
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील विश्वसनीय नाव असलेल्या मंगेश मोटर्सच्या मारुती सुझुकी अरिना या शोरूमचे सोमवारी थाटात उद्घाटन झाले. कॅम्प येथे हे नवी शोरूम असून या ठिकाणी मारुती सुझुकीच्या सर्व कार उपलब्ध असणार आहेत. या शोरूमचे उद्घाटन केएलईचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे, उद्योजक राम भंडारे, उद्योजक डॉ. सचिन सबनीस यांच्या हस्ते पार पडले.
डॉ. प्रभाकर कोरे यांनी नव्या शोरूमला शुभेच्छा देत सध्या देशामध्ये प्रत्येक महिन्याला पाच लाख कार खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे वाहन क्षेत्रामध्ये मोठी संधी निर्माण झाली असून देशपांडे कुटुंबाने देशातील सर्वात विश्वसनीय कार व्यवसायात गुंतवणूक केल्याने अभिनंदन केले. बॅटरी, फ्रीज, दुचाकी अशा लहान उद्योगातून सुरू झालेला हा उद्योग आता मोठ्या कारपर्यंत येऊन पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
राम भंडारे म्हणाले, चांगल्या सर्व्हीसमुळे मंगेश मोटर्सचे नाव सर्वत्र झाले. ग्राहकांचा हाच विश्वास त्यांनी यापुढेही टिकवावा, असे त्यांनी सांगितले. डॉ. सचिन सबनीस म्हणाले, देशाच्या घराघरात पोहोचलेला मारुती सुझुकी हा ब्रँड असून अनेकांची चारचाकी घेण्याची स्वप्ने त्यांनी पूर्ण केली आहेत. या नव्या शोरूममुळे बेळगावमधील नागरिकांना कारसोबत चांगल्या सेवाही मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कपिल देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. नीता देशपांडे यांनी परिचय करून दिला. तर रोहीत देशपांडे यांनी मंगेश मोटर्सची माहिती दिली. पहिल्या पाच ग्राहकांना उपस्थितांच्या हस्ते कारच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रांजल शहा यांनी आभार मानले.
पत्रकार परिषदेत बोलताना मंगेश मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहीत देशपांडे म्हणाले, सध्याच्या मार्केटमधील 40 टक्के शेअर्स हा मारुती सुझुकी कंपनीचा आहे. मारुती सुझुकी अरिना या नव्या शोरूममध्ये सर्व प्रकारच्या कार उपलब्ध असणार आहेत. 6 लाखांपासून ते 20 लाखांपर्यंत विविध सेगमेंटमधील कार विक्री सुरू करण्यात आली आहे. सध्या बेळगावमध्ये प्रती महिना 800 ते 900 कार खरेदी होत असल्याने एक व्यावसायिक संधी असल्याने हे नवे शोरूम सुरू करण्यात येत आहे.
बेळगावच्या वाहन क्षेत्रात देशपांडे कुटुंबातील चार पिढ्या कार्यरत आहेत. सचोटी आणि ग्राहकांचा विश्वास यामुळेच बेळगावमधील एक विश्वसनीय नाव म्हणून मंगेश मोटर्सकडे पाहिले जाते. मागील 35 वर्षांत 2.50 लाखांहून अधिक वाहनांची विक्री मंगेश मोटर्सने केली आहे. सध्याच्या बाजारपेठेचा विचार करून अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे मारुती सुझुकीच्या सर्व कार उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी डॉ. नीता देशपांडे यांनी मंगेश मोटर्सची माहिती दिली. यावेळी संचालक कपिल देशपांडे उपस्थित होते.
