For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवरात्रोत्सवाच्या आरतीवरून घरी परतताना नववीतील विद्यार्थिनीची हत्या; मंदिराच्या आवारात धारदार शस्त्राने हल्ला!

02:48 PM Oct 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
नवरात्रोत्सवाच्या आरतीवरून घरी परतताना नववीतील विद्यार्थिनीची हत्या  मंदिराच्या आवारात धारदार शस्त्राने हल्ला
Advertisement
माणगाव (ता. हातकणंगले) : नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात आरती करून घरी परतणाऱ्या नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास माणगाव येथे घडली. स्वरा नितीन उपाध्ये (वय अंदाजे 14 वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित अरुण लगम्मावर (वय 37, रा. माणगाव) याचा शोध हातकणंगले पोलिसांकडून सुरू होता. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आरतीवरून परतताना हल्ला

स्वरा ही चंद्रप्रभू मंदिराच्या आवारात राहत होती. धार्मिक वृत्तीच्या स्वराची नवरात्रोत्सवातील मंदिरातील आरतीला दररोज उपस्थिती असायची. शनिवारीही ती वैष्णवी देवीच्या मंदिरात आरतीसाठी गेली होती. आरती आटोपून घरी परतत असताना मंदिराच्या आवारातच संशयिताने तिच्यावर एडक्यासारख्या धारदार शस्त्राने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Advertisement

या हल्ल्यात स्वरा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली.

रुग्णालयात दाखल; मात्र मृत घोषित

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी हे पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी स्वराला उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

Advertisement

या घटनेमुळे माणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलीच्या हत्येमुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची तपासणी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची तपासणी करून आवश्यक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, संशयित अरुण लगम्मावर याला शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली होती. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

हत्येमागील कारणाचा तपास सुरू

स्वरावर हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे तपास सुरू आहे. संशयिताचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतल्यानंतर हल्ल्यामागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मृत स्वराच्या पार्थिवाचे रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता सीसीटीव्हीच्या निगराणीखाली शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार होता.

नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिराच्या आवारात घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.