कचऱ्यामुळे दिघंचीतील माणगंगा प्रदूषित
दिघंची
यावर्षी ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने राजेवाडी तलाव ऐतिहासात प्रथमच मे महिन्यात ओव्हरफलो झाला. पर्यायाने ते पाणी पुढे माणगंगेला येऊन मिळाले व दिघंचीत माणगंगेला पाणी आले. वर्षभर कोरडी असलेली माणगंगा वाहती झाली. दिघंचीमधील व्यवसायिकांनी व नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे सर्व पाणी प्रदूषित झाले असल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दिघंचीला सगळ्यात मोठे नदी पात्र आहे. यावर्षी दमदार पावसामुळे शेतकरी आनंदित आहे. परंतु माणगंगा नदीत अनेक व्यवसायिक साठलेला कचरा, इतर तत्सम साहित्य, टाकाऊ वस्तू असा कचरा नदीपात्रात टाकतात. त्यामुळे नदीपात्राचे कचरा कुंडीत रूपांतर झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी दुर्गंधियुक्त झाले आहे.
याबाबत उपाययोजना करण्याबाबत दिघंचीचे सामाजिक कार्यकर्ते शहाजी यादव यांनी ग्रामपंचायतला निवेदन देऊन याबाबत ग्रामपंचायतीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. दिघंचीतील हॉटेल व्यवसायिक, मटन, चिकन मार्केट, मच्छी मार्केट, व अन्य व्यापारी यांनी आपला घनकचरा टाकायचा कुठे हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. ग्रामपंचायतने हा घनकचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. गावचे गटारीचे पाणी नदी व ओढापत्रात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे किंवा पर्यायी शोषखड्डे घेऊन त्यामध्ये हे पाणी सोडले पाहिजे. ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी मिळून भविष्यात नदी व ओढापात्र गटार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन शहाजी यादव यांनी केले आहे.
दिघंची ग्रामपंचायतीने यापूर्वी व्यवसायिकांना घन कचरा नदीपात्रात व ओढा पात्रात टाकू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यातबाबत सूचना दिल्या होत्या. आतादेखील नदीपात्रात घनकचरा टाकताना आढळल्यास कडक कारवाई करून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिघंची ग्रामपंचायतीने दिला आहे. येणाऱ्या काळात नदीपात्र स्वच्छ व सुंदर होण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही दिघंचीचे माजी सरपंच अमोल मोरे यांनी दिली.
दिघंचीमधील माणगंगा नदीपात्रामध्ये यादव वस्ती बंधारा आहे. या बांधाऱ्यामध्ये पाणी आडवले जाते. परंतु या बंधाऱ्यातील दुर्गंधियुक्त कचऱ्यामुळे पाणी देखील दुर्गधियुक्त झाले आहे त्यामुळे पोहणाऱ्या नागरिकांची तर गैरसोय होणार आहेच. परंतु नदी काठाला राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
निसर्गाने दिघंचीला माणगंगा नदीच्या रूपाने वरदान दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी, व्यापारी वर्गाने स्वतः पुढाकार घेऊन नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. घनकचरा नदीपात्रात न टाकता योग्य विल्हेवाट लावली पाहजे. सर्वांनी आपले नदीपात्र स्वच्छ व सुंदर ठेवूया, असे भावनिक आवाहन समाजिक कर्यकर्ते शहाजी यादव यांनी केले आहे.