धूम स्टाईलने मंगळसूत्र लंपास
कोल्हापूर :
बेकरीमधून साहित्य घेवून दुचाकीवरुन घरी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याचे मंगळसुत्र चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केले. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नागाळा पार्क येथील पाटलाचा वाडा ते जिल्हा परिषद रोडवर ही घटना घडली. याबाबतची फिर्याद तृप्ती अनुप जोशी (वय 40 रा. नागाळा पार्क) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. जोशी यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांनी दुचाकीवरुन धुम ठोकली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तृप्ती जोशी या एका बँकेमध्ये नोकरीस आहेत. शुक्रवारी सायंकाळी त्या मोपेडवरुन घरी परत निघाल्या होत्या. यावेळी हॉटेल पाटलाचा वाड येथील बेकरीमध्ये त्या साहित्य घेण्यासाठी थांबल्या होत्या. साहित्य घेवून त्या घरी जात असताना पंचरत्न अपार्टमेंट जवळ आल्या असता, पाठीमागून दोन दुचाकीस्वार आले. त्यांनी जोशी यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसडा मारुन लंपास केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जोशी घाबरल्या त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी दुचाकीवरुन धूम ठोकली. यानंतर जोशी यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार दिली. शाहूपुरी पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेवून परिसरातील सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
- धूम स्टाईलने चोरी
दुचाकीवरुन आलेले चोरटे हे 20 ते 25 वयोगटातील होते. त्यातील पाठीमागे बसलेल्या चोरट्याने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. त्यानेच हिसडा मारुन चेन लंपास केली. चोरीच्या घटनेनंतर धूम स्टाईलने या दोघांनी पोबारा केला.