For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहापुरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

06:40 AM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
शहापुरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले
Advertisement

पहिल्याच श्रावण सोमवारी घडलेल्या घटनेमुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

श्रावण सोमवारनिमित्त नाथ पै सर्कल येथील अंबाबाई देवस्थानला जाऊन घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 1 लाख 58 हजार रुपये किमतीचे 19 ग्रॅम मंगळसूत्र हिसकावून घेऊन चोरट्यांनी पलायन केले आहे. सोमवार दि. 17 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास सरस्वती रोड शहापूर येथे ही घटना घडली असून याप्रकरणी शोभा प्रकाश जरतारकर (रा. सरस्वती रोड शहापूर) यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

Advertisement

पहिल्याच श्रावण सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी शोभा या सोमवारी पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त नाथ पै सर्कल येथील अंबाबाई देवस्थानला गेल्या होत्या. दर्शन आटोपून त्या पुन्हा आपल्या घराकडे जाण्यासाठी पायी चालत सरस्वती रोड शहापूर येथून जात होत्या. तितक्यात रात्रीच्या अंधारात त्यांच्या मागून आलेल्या एका अनोळखी चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्राला हिसडा मारला. त्यामुळे मंगळसूत्र तुटून चोरट्याच्या हाती लागले. घटना घडताच शोभा यांनी आरडाओरड केली. मात्र चोरट्याने घटनास्थळावरून पलायन करून काही अंतरावर थांबलेल्या एका मोटारसायकलवर बसून पोबारा केला.

शोभा यांनी शहापूर पोलीस स्थानक गाठून घडलेली घटना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून घेत तपास चालविला आहे. मात्र पहिल्याच श्रावण सोमवारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :

.