चिपळूण बसस्थानकातून २ लाखांचे मंगळसूत्र लंपास ! बसस्थानकात दागिने चोरीचे सत्र सुरुच
यापूर्वी घडलेल्या चोरीचा अद्याप उलघडा नाही; महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
चिपळूण प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात दागिने चोरीचे सत्र सुऊच आहे. काही दिवसांपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल 2 लाख किंमतीचे 4 तोळ्यांचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताचा शोध सुऊ केला आहे. दरम्यान, बसस्थानकात सातत्याने होत असलेल्या दागिने चोरीच्या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 ते 1 या कालावधीत ही महिला शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात एसटीची वाट पाहत होती. त्यावेळी प्रवाशांची झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्या महिलेच्या पिशवीतील पर्समधून 2 लाख किंमतीचे 4 तोळ्यांचे मंगळसूत्र चोरुन नेले. हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून महिला प्रवाशाच्या दागिने चोरीचे प्रमाण वाढले असून यापूर्वीही अशा बऱ्याच चोरीच्या घटना घडल्या आहेत. परिणामी दागिने चोरीच्या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.