For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मंगळूर-मडगाव वंदे भारत धावणार आजपासून

09:14 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
मंगळूर मडगाव वंदे भारत धावणार आजपासून

केवळ कारवार, उडुपी रेल्वे स्थानकावर थांबणार : 300 विद्यार्थ्यांना मोफत पास प्रवास

Advertisement

कारवार : शनिवार दि. 30 पासून मंगळूरहून मडगावपर्यंत धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे कारवार (शिरवाड) रेल्वेस्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती कारवार जिल्हा प्रशासनाने दिली आहे. शनिवार दि. 30 रोजी सकाळी 11 वाजता मंगळूर सेंट्रल रेल्वेस्थानकावरून निघणारी ही रेल्वे 2 वाजून 54 मिनिटांनी कारवार रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे. बहुचर्चित आणि प्रतिष्ठित या रेल्वेचे कारवार रेल्वे स्थानकात आगमन होताच फुलांची उधळण केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर विविध सांस्कृतिक कलापथके रेल्वेचे दिमाखात स्वागत करणार आहेत. त्यानंतर कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल रेल्वेला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही रेल्वे मडगावच्या दिशेने धावणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून रेल्वेतून मडगावला जाऊन येण्यासाठी 300 शालेय विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे सिनीयर प्रादेशिक अभियंते बी. एस. नाडगे यांनी दिली आहे. आठ डबे असलेली ही रेल्वे प्रतितास 120 किमीहून अधिक अंतर कापू शकते. ही संपूर्ण रेल्वे संपूर्ण एसी असून रेल्वेत विमानाप्रमाणे आसन व्यवस्था आहे. रेल्वेत शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय आहे. वायफाय रिEिडग लाईट व्यवस्था, स्वयंचलित दरवाजे, स्मीक अलर्ट, सीसीटीव्हीसह अन्य आधुनिक सुविधा या रेल्वेत आहेत. रविवारचा अपवाद वगळता उरलेले सहा दिवस ही रेल्वे धावणार आहे. मंगळूरहून 11 वाजता निघणारी ही रेल्वे, मडगावला 4 वाजून 40 मिनिटांनी पोहचणार आणि मडगावहून 5.10 वाजता निघून रात्री 10.15 ला मंगळूरला पोहचणार आहे. मंगळूर आणि मडगाव दरम्यान उडुपी आणि कारवार या दोनच स्थानकावर ही रेल्वे थांबणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.