मंगलमूर्ती अॅकॅडमीचा पॅकर्स क्लबवर सहज विजय
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित (कै) बाबा (विक्रमसिंह) भोसले ट्रॉफी टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेअंतर्गत झालेल्या सामन्यात मंगलमूर्ती क्रिकेट अॅकॅडमीने पॅकर्स क्रिकेट क्लबवर 86 धावानी विजय मिळविला. या सामन्यात मंगलमूर्तीला विजयीसाठी करण्यासाठी मयुरेश पाटीलने दिड शतक ठोकण्याचा तर सौरभ नलवडे पाच बळी घेण्याचा पराक्रम केला.
राजाराम कॉलेज मैदानात हा सामना झाला. प्रथम फलदांजी करताना मंगलमूर्ती क्रिकेट अॅकॅडमीने 20 षटकांत 4 बाद 258 धावांचा पाऊस पाडला. पॅकर्स क्लबच्या गोलंदाजांचा समाचार घेत मयुरेश पाटील 61 चेंडूत नाबाद 158 धावा केल्या. याचबरोबर सुरेश सातपुतेने 48, सुदर्शन भोसलेने 20 व रणजीत मानेने 17 धावा करत मंगलमूर्ती अॅकॅडमीची धावसंख्या भक्कम केली. गोलंदाजी करताना पॅकर्स क्लबच्या सुधीर तोडकर व कार्तिक पाटील यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पॅकर्स क्लबने 20 षटकांत 9 बाद 172 धावा केल्या. त्यामुळे या संघाचा 86 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. क्लबतच्या पराभवामुळेच जुनेद मलबारीच्या 50, कार्तिक पाटीलच्या 28, सुमित कदमच्या 24 व सुधिर तोडकरच्या 22 व अर्णव पाटील नाबाद 26 धावा कुचकामी ठरल्या. गोलंदाजी करताना सौरभ नलवडेने 5 तर वैभव नलवडे व विष्णू बिराजदार यांनी प्रत्येकी 2 बळी घेत पॅकर्स क्लबला 86 धावांनी पराभूत करण्यात मोलाचा वाटा उचलला.