वाढदिवस करून परतताना एकाच कुटुंबातील ६ जणांवर काळाचा घाला
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी राज्य महामार्गावर आज एक मोठा अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. वाढदिवसाच्या करून घरी परतताना हा अपघात झाला या अपघाताने जिल्ह्याला मोठा का बसला असून जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजूरी राज्य महामार्गावर हा मोठा अपघात पहाटेच्या सुमारास घडला असून यामध्ये तासगावातील अभियंता राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. आपल्या दोन मुली आणि पत्नीसह राजेंद्र पाटील हे कवठेमहाकाळ येथे वाढदिवसानिमित्त गेले होते. कार्यक्रम आटोपून तासगावला परतताना भरधाव असलेल्या कारचा ताबा सुटल्याने ती तासगाव- मणेराजुरी राज्य महामार्गावर एस. एस. मंगल कार्यालयाजवळ थेट ताकारी कॅनॉलमध्ये पडली. कॅनॉलमध्ये पाणी नसले तरी अत्यंत भरधाव असल्याने कार कॅनॉलमध्ये आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. यामध्ये मृत अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ६०), पत्नी सुजाता पाटील (वय ५५), मुलगी प्रियांका अवधूत खराडे (वय ३०) नात ध्रुवा (वय ३), राजवी (वय २), कार्तिकी (वय १), जखमी मुलगी स्वप्नाली विकास भोसले (वय ३०) सर्वजण रा. कोकळे यांचा समावेश आहे.
दरम्यान, हा भीषण अपघात मंगळवारी रात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान झाला असल्याचे समजते. त्यातील जखमी मुलगी रात्रभर गाडीत बसून होती. रात्रभर रस्त्यावर कोणीही नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही. या अपघाताची माहीती तासगाव तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली. एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींवर अशा प्रकारे काळाने घाला घातल्याने तासगाव तालुक्यांसह राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.