मंद्रूप पोलिसांची धडक कारवाई; बेकायदा दारूसाठ्यासह 7.63 लाखांचा मुद्देमाल जप्त; 13 मैल–टाकळी मार्गावर कारवाई; एकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल
मंद्रूप | प्रतिनिधी अभिजीत जवळकोटे : बेकायदा दारू वाहतुकीविरोधात मंद्रूप पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. 30 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास 13 मैल ते टाकळी मार्गावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत विविध कंपन्यांची बिअर, विदेशी मद्य, कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 7 लाख 63 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, शेखर गुरबाळाप्पा बगले (वय 35, रा. टाकळी, ता. दक्षिण सोलापूर) हा संशयित बेकायदा दारूसाठा घेऊन जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचे मद्य आढळले.
कारवाईदरम्यान 48 बिअरच्या बाटल्या, 40 रॉयल स्टॅग, 42 इम्पीरियल ब्ल्यू आणि 13 ब्लेंडर्स प्राईडचे क्वॉर्टर तसेच 24 किंगफिशर बिअर टिन असा दारूसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरली जात असल्याचे सांगितलेली बलेनो कार (एमएच 13 ईके 4918), एक मोबाईल फोन आणि 1 हजार रुपये रोख रक्कमही पोलिसांनी ताब्यात घेतली.
या कारवाईनंतर मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 420/2026 नोंद करण्यात आला आहे. संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम 65(ई) आणि 65(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदा मद्याची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून वाहनांची तपासणी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राजकुमार गुरव करीत आहेत. जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्याचा स्रोत, वाहतुकीचा उद्देश आणि या प्रकरणाशी संबंधित अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू आहे.