मंद्रूप परिसरातील 20 हजार 762 शेतकऱ्यांची दिवाळी गोड; 10.38 कोटींची दुष्काळी मदत खात्यात जमा
पावसाच्या ओढीमुळे पिकांचे मोठे नुकसान
यंदा पावसाने ओढ दिल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केलेली मका, बाजरी, उडीद, सोयाबीन, भुईमूग आदी पिके उगवून आल्यानंतर पावसाअभावी करपून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.
33 टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून ही आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
2 ते 5 नोव्हेंबरदरम्यान मदत वितरण
प्रशासनाकडून 2 नोव्हेंबरपासून थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 2 व 3 नोव्हेंबर रोजी स्वतंत्र खाते असलेल्या शेतकऱ्यांना, तर 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान उर्वरित पात्र खात्यांवर मदत जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर शासनाकडून मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. पीक नुकसान आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या मदतीमुळे मंद्रूप परिसरातील शेतकऱ्यांची दिवाळी काही प्रमाणात गोड होणार आहे.
