For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंद्रुपमध्ये जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

09:19 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंद्रुपमध्ये जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप  दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल
Advertisement
मंद्रुप: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे जागेच्या साफसफाईवरून झालेल्या वादात जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी दोन व्यक्तींविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र आडवेळप्पा कांबळे (वय ३३, रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता ते आपल्या काका व चुलत भावांसह ग्रामपंचायत मंद्रुप हद्दीतील मिळकत क्रमांक १५७३ येथील जागेची साफसफाई करत होते. ही जागा त्यांच्या आजोबांच्या नावावर असून वारसाहक्काने वडील व काकांकडे आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

यावेळी वाघेश महादेव म्हेत्रे आणि रवि महादेव म्हेत्रे हे दोघे मोटारसायकलवरून तेथे आले. त्यांनी साफसफाईच्या कामात अडथळा आणला. तसेच जातिवाचक अपमानास्पद शब्द वापरून शिवीगाळ केली आणि कुऱ्हाडीने मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२), ३५१(३), ३५२ व ३(५), तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisement

२५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.५५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सोलापूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप करीत आहेत. गुन्हा दाखल झाला, त्या वेळी आरोपींना अटक करण्यात आलेली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement
Tags :

.