Datta Jayanti 2025 | नृसिंहवाडीमध्ये दत्त जन्मोत्सवानिमित्त भाविकांची मांदियाळी
दत्त जन्म सोहळ्यात 3 लाख भाविकांचा उल्लेखनीय सहभाग
by रवींद्र केसरकर
नृसिंहवाडी : मार्गशीर्ष गुरुवार व दत्त जन्म का सोहळा असा दुर्मिळ योग आल्याने आज दत्त जन्मोत्सवानिमित्त येथील कृष्णा तीरावर भाविकांच्या गर्दीने जणू भक्तीचा मळाच फुलला होता. श्री दत्तप्रभूंचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपसाधनेने पावन झालेल्या या क्षेत्रावरील दत्त जन्म सोहळ्यास विशेष महत्त्व आहे.
त्यातच आज मार्गशीर्ष गुरुवार व दत्त जन्मोत्सव असा दुर्मिळ योग आल्याने 3 लाखावर भाविकांनी दर्शन दर्शन योगाच्या पर्वणीचा लाभ घेतला. दत्त जन्मोत्सव आज मुख्य दिवशी पहाटे तीन वाजता काकड आरती, प्रातःकालीन पूजा, यानंतर सकाळी भक्त भाविकांचे अभिषेक, दुपारी श्रींच्या चरण कमलावर महापूजा, यानंतर पवमान पंचसूक्त पठण असे कार्यक्रम पार पडल्यानंतर श्रींच्या जन्मकाळ सोहळ्यासाठी वस्त्र अलंकाराने सजलेली श्रींची उत्सव मूर्ती सहवाद्य व दिगंबरा दिगंबराच्या गजरात दुपारी चार वाजता मुख्य मंदिरात आणण्यात आली,
वेदमूर्ती दिलीप शास्त्री उपाध्ये यांचे पुराण झाले, त्यानंतर कीर्तन होऊन सायंकाळी ठीक 5 वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा पार पडला. आजची गर्दी लक्षात घेऊन दत्त देव संस्थांमार्फत नव्याने उभारण्यात आलेल्या दर्शन सभा मंडप चा विविध रांगांच्या माध्यमातून उपयोग करण्यात आला. तसेच भाविकांना पिण्याचे पाणी, प्रथम औषध उपचार, महाप्रसाद,निवारा मंडप आधी सोयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या,
यासाठी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव गजानन गेंडे पुजारी, सर्व विश्वस्त कर्मचारी तसेच दत्त हायस्कूलचे विद्यार्थी यासाठी विशेष परिश्रम घेत होते, ग्रामपंचायतीमार्फत चार चाकी दोन चाकी वाहन पार्किंग यात्रेचे नेटके नियोजन करण्यात आले होते. यासाठी सरपंच चेतन गवळी, उपसरपंच अनघा पुजारी, ग्रामपंचायत अधिकारी हेमंत कोळी तसेच सर्व कर्मचारी विशेष परिश्रम घेत होते.