आयसीसीच्या महिला विश्वचषक संघात मानधना, जेमिमा, दीप्तीला स्थान
वृत्तसंस्था/ दुबई
मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट संघात विजेत्या भारतीय स्टार खेळाडूंनी वर्चस्व गाजवले आहे. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा यांना या संघात स्थान मिळाले आहे.
या भारतीय त्रिकुटाने संघाच्या पहिल्या विश्वचषक जेतेपदात उत्कृष्ट भूमिका बजावली. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्याही तीन खेळाडूंना संघात स्थान दिले आहे, ज्यामध्ये कर्णधार लॉरा वोल्वार्डचा समावेश आहे. तिने 71.37 च्या सरासरीने 571 धावा करून महिला विश्वचषकाच्या कोणत्याही एका आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आहे. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील अॅनाबेल सदरलँड, अॅश गार्डनर आणि लेगस्पिनर अलाना किंग यांचाही या संघात समावेश आहे. अंतिम चार संघांमध्ये स्थान न मिळविलेल्या संघांपैकी पाकिस्तानची यष्टिरक्षक सिद्रा नवाजचा तेवढा समावेश त्यात आहे, असे आयसीसीने म्हटले आहे.
इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनचाही समावेश करण्यात आला आहे. तिच्यामुळे संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यास मदत झाली, तर तिचीच सहकारी नॅट सायव्हर-ब्रंट 12 वी खेळाडू आहे. भारतीय सलामीवीर मानधनाने या विश्वचषकात 54.25 च्या सरासरीने 434 धावा केल्या, ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतके आहेत. सातत्याचे उदाहरण असलेल्या मानधनापेक्षा या स्पर्धेत केवळ वोल्वार्डने जास्त धावा काढल्या. नवी मुंबईत न्यूझीलंडविऊद्ध मानधनाने केलेल्या 109 धावा हे तिच्या कामगिरीचे वैशिष्ट्या राहिले. त्या शतकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविऊद्ध 80 आणि 88 धावा केल्याने मानधनाची सर्वोत्तम संघांविऊद्ध चांगली कामगिरी करण्याची क्षमता दिसून आली.
जेमिमा रॉड्रिग्सने 58.40 च्या सरासरीने 292 धावा केल्या, ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक यांचा समावेश राहिला. भारताच्या या तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेत इतरही सामन्यांत चांगल्या धावा केल्या असल्या, तरी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविऊद्ध नाबाद 127 धावांची तिची जबरदस्त खेळी तिला संघात समाविष्ट करण्यास कारणीभूत ठरली आहे. तिच्या न्यूझीलंडविऊद्धच्या नाबाद 76 धावांनी भारताला उपांत्य फेरीत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या अंतिम सामन्यात शफाली वर्माच्या दमदार खेळीसोबत रॉड्रिग्सने काढलेल्या 24 धावांनीही चांगली मदत केली.
फलंदाजीत दीप्तीने एक शतक आणि तीन अर्धशतकांसह 30.71 च्या सरासरीने 215 धावा केल्या. शिवाय तिने 20.40 च्या सरासरीने 22 बळीही घेतले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेल्या दीप्तीने भारताच्या विजेतेपदाच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. ती आघाडीची बळी घेणारी गोलंदाज ठरली आणि संपूर्ण स्पर्धेत तिने महत्त्वपूर्ण धावाही केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 39 धावांत 5 बळी घेण्याबरोबर तिने 58 धावा केल्या
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेचा संघ : 1. स्मृती मानधना (भारत) 2. लॉरा वोल्वार्ड (कर्णधार-दक्षिण आफ्रिका) 3. जेमिमा रॉड्रिग्स (भारत) 4. मॅरिझान कॅप (दक्षिण आफ्रिका) 5. अॅश गार्डनर (ऑस्ट्रेलिया) 6. दीप्ती शर्मा (भारत) 7. अॅनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया) 8. नादिन डी क्लार्क (दक्षिण आफ्रिका) 9. सिद्रा नवाज (यष्टीरक्षक-पाकिस्तान) 10. अलाना किंग (ऑस्ट्रेलिया) 11. सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), 12 वी खेळाडू: नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड).