आरटीआय अर्जांची दोन दिवसांत नोंदणी सक्तीची
राज्य सरकारचे दोन महत्त्वाचे निर्णय; बेंगळूर वन, कर्नाटक वन अन् ग्राम वन केंद्रांतूनही अर्जांची सुविधा
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर
माहितीचा अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासह सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढविण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे प्राप्त होणाऱ्या आरटीआय अर्जांची दोन दिवसांच्या आत ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ही सेवा कर्नाटक सकाल सेवा कायदा, 2011 च्या कक्षेत आणण्यात आली आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंजुरीनंतर हे निर्णय घेण्यात आल्याचे अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सरकारी कार्यालयांना टपालाद्वारे किंवा प्रत्यक्ष सादर केलेले आरटीआय अर्ज स्वीकारल्यानंतर दोन दिवसांच्या आत माहिती अधिकाराच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदवावे लागतील. या प्रक्रियेला सकाल कायद्यांतर्गत हमी सेवा म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे अर्जांच्या नोंदणीमध्ये होणारा विलंब रोखण्यास मदत होणार आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला नोंदणी क्रमांक दिला जाईल. या क्रमांकाच्या आधारे अर्जाची सद्यस्थिती आणि त्यावरील कार्यवाहीची माहिती तपासता येईल. अर्ज हरविणे, त्याकडे दुर्लक्ष होणे किंवा अर्जाच्या प्रगतीची माहिती न मिळणे यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सरकारच्या दुसऱ्या निर्णयानुसार, राज्यभरातील बेंगळूर वन, कर्नाटक वन आणि ग्राम वन सेवा केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाईन आरटीआय अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संगणक किंवा इंटरनेटची सुविधा नसलेल्या नागरिकांना तसेच ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात अडचणी येणाऱ्यांना जवळच्या सेवा केंद्रात जाऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीने अर्ज सादर करता येईल. यासाठी निर्धारित आरटीआय शुल्कासोबत अल्प सेवा शुल्क भरावे लागेल. अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराला त्याच केंद्रातून ऑनलाईन पावती दिली जाईल.
विलंब झाल्यास दाद मागण्याची संधी
निर्धारित दोन दिवसांच्या मुदतीत अर्जाची ऑनलाईन नोंदणी न झाल्यास अर्जदाराला सकाल कायद्यांतर्गत दाद मागता येणार आहे. अर्ज नोंदणीतील विलंबासाठी संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमधील अर्ज स्वीकारण्याच्या आणि नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत अधिक शिस्त येण्याची अपेक्षा आहे.
