दुकानांच्या नामफलकांवर 60 टक्के कन्नडची सक्ती
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखालील बैठकीत चर्चा
बेंगळूर : कन्नडिग संघटनांनी बेंगळुरात दुकानांवरील फलकांवर कन्नडसक्तीसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी बेंगळुरात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी दुकाने व इतर व्यावसायिक गाळ्यांवरील नामफलकांवर 60 टक्के कन्नडचा वापर करण्यासंबंधी कायदा दुरुस्तीवर चर्चा झाली. तसेच अध्यादेश जारी करून 28 फेब्रुवारी 2024 पूर्वी याच्या अंमलबजावणीसाठी मुदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, कन्नड भाषा समग्र विकास अधिनियम-2022 च्या सेक्शन 17(6) मध्ये दुरुस्ती केली जाईल. सरकार किंवा स्थानिक प्राधिकरणांची परवानगी घेऊन चालविण्यात येणारे व्यवसाय, उद्योग, व्यापारी संकुल, समुपदेशन केंद्रे, रुग्णालये, प्रयोगशाळा, मनोरंजन केंद्रे आणि हॉटेल इत्यादी नावे दर्शविणाऱ्या नामफलकांवरील नावे वरील निम्म्या भागात कन्नडमध्ये असावीत, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी 2028 मध्ये जारी केलेल्या आदेशात दुकानांवरील नामफलकांवर 60 टक्के कन्नड भाषा आणि 40 टक्के इतर भाषांचा वापर करता येईल, असे सांगण्यात आले होते. याप्रमाणेच अध्यादेश जारी करून कन्नड भाषा समग्र विकास अधिनियम 2022 च्या सेक्शन 17(6) मध्ये दुरुस्ती करून 28 फेब्रुवारी 2024 पूर्वी अंमलबजावणीचे आदेश व्यापारी आस्थापनांना दिले जातील, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले.