नामफलकांवरील 60 टक्के कन्नडसक्तीचा आदेश जारी
बेंगळूर : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत झालेल्या कन्नड भाषा समग्र विकास (दुरुस्ती) विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने राजपत्रित आदेश जारी केला आहे. यामुळे राज्यात यापुढे दुकाने, व्यापारी संकुल, हॉस्पिटल व वाणिज्य संस्थांवरील नामफलकांवर 60 टक्के कन्नड भाषेचा वापर करणे सक्तीचे आहे. राज्य सरकारने कन्नड भाषा समग्र विकास (दुरुस्ती) विधेयक विधानसभेत संमत झाल्यानंतर ते शुक्रवारी विधानपरिषदेतही संमत झाले. त्यानंतर लागलीच सरकारने ते मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविले होते. सोमवारी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंजुरी दिल्यानंतर सरकारने राजपत्रित आदेश जारी केला. सरकारी किंवा स्थानिक प्राधिकरणांकडून परवानगी घेतलेले आणि मंजुरी मिळवून सुरू केलेली वाणिज्य संस्था, कारखाने, ट्रस्ट, समुपदेशन केंद्रे, इस्पितळे, प्रयोगशाळा, मनोरंजन केंद्रे, हॉटेल व इतर ठिकाणी नामफलकांवर वरील भागात 60 टक्के प्रमाणात कन्नड भाषेचा वापर करणे सक्तीचे आहे. कन्नड विकास प्राधिकरण आणि कन्नड आणि सांस्कृतिक निर्देशनालयावर यांच्यावर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.