अमेरिकेतील जलतरण स्पर्धेत मंदार यांना 6 पदके
कोल्हापूर :
बर्मिंगहॅम (अमेरिका) येथे सुऊ असलेल्या वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्सअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मंदार दिवसे यांनी क्रीडानगरी कोल्हापूरला साजेशी कामगिरी केली आहे. त्यांनी स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध करताना जलतरणातील विविध प्रकारात 4 सुवर्ण व 2 रौप्य पदक पटकावण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
गुजरात येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय पोलीस गेम्समधील जलतरण स्पर्धेतील जलतरणाच्या विविध प्रकारात मंदार यांनी 8 सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाची कामगिरी केली होती. या कामगिरीमुळेच त्यांची बर्मिंगहॅम (अमेरिका) येथे सुऊ असलेल्या वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्समधील जलतरण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. आपल्या निवडीला सार्थ ठरवत मंदार यांनी तलावात आयोजित केलेल्या 2 मैल (3.2 किलो मीटर) पोहणे या प्रकारात 1 रौप्य पदक भारताला जिंकून दिले. 200 मीटर मिक्स रिले प्रकारातही मंदार यांनी वेगवान कामगिरी करत सांघिक रौप्य पदक देशाला मिळवून दिले.
स्पर्धेतील वैयक्तिक प्रकारात पदक जिंकण्याची भुक मंदार यांनी कायम ठेवली. त्याचेच प्रत्यंत्तर घडवत मंदार यांनी स्पर्धेतील 400 मीटर फ्रीस्टाईल या प्रकारात 1 सुवर्ण आणि 4 बाय 50 मीटर रिले प्रकारात सांघिक सुवर्ण जिंकून आपला दबदबा निर्माण केला. सर्वात अवघड आणि जलतरणपटूंच्या अंगातील क्षमतेची परीक्षा घेणाऱ्या 1500 मीटर फ्रीस्टाईल या प्रकारात मंदार यांनी विविध देशांमधील तरबेज जलतपटूंना मागे टाकत सुवर्ण आपल्या नावावर केले. इतकेच नव्हे तर 200 मीटर आयएम प्रकारातही त्यांनी जगभरातील दमदार जलतरणपटूंवर आपली छाप उमटवत सुवर्ण पदक पटकावले. मंदार हे सध्या बीएसएफमध्ये (सीमा सुरक्षा दल) निरीक्षक म्हणून सेवा बजावत आहे. सेवा बजावतच ते बीएसएफ सेंट्रल अॅक्वेटिकमध्ये जलतरणाचा सराव करत आहेत. तसेच अॅक्वेटिकमध्ये इतरांनाही मुख्य प्रशिक्षक म्हणून जलतरणाचे प्रशिक्षण देत आहेत.
यापूर्वी कॅनडा (2023), चीन (2019) आणि अमेरिका (2017) येथे वर्ल्ड पोलिस अॅण्ड फायर गेम्सअंतर्गत आयोजित केलेल्या जलतरण स्पर्धांमध्येही मंदार यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जगाचे लक्ष वेधून घेतले होते.