मंदाना करीमीचा अभिनयाला रामराम
अभिनेत्री मंदाना करीमीने आता अभिनयाच्या क्षेत्राला रामराम ठोकला आहे. इराणी अभिनेत्री आणि मॉडेलने ‘क्या कूल हैं हम 3’ आणि थार यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. परंतु मंदाना आता पूर्णपणे शिक्षणावर लक्ष केंद्रीत करू इच्छिते. इंटीरियल डिझायनिंगचे शिक्षण घेतल्यावर मी याच क्षेत्रात सक्रीय आहे. अनेक संस्थांमध्ये मी व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम करत असल्याचे तिने सांगितले आहे.
अत्यंत कमी वयात मॉडेल म्हणून नाव कमाविले होते. याचमुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले होते. माझ्या एका मित्राची एक इंटीरियर डिझाइन फर्म असून त्यानेच मला याचे शिक्षण घेण्याची सूचना केली होती. या क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आवड निर्माण झाल्याचे ती सांगते. मंदाना सध्या 36 वर्षांची असून अभिनयाच्या क्षेत्रात कधीच रमले नसल्याचे वक्तव्य तिने केले आहे.
इंटीरियर डिझाइनिंगमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मंदाना आता मॉडेलिंग आणि अभिनयाशी निगडित ऑफर्स नाकारत आहे. कारण तिला या क्षेत्रात पुन्हा परतायचे नाही. माझ्याकडे प्रोजेक्ट्स, इव्हेंट्स आणि माझे शिक्षण देखी असून त्यावरच मी लक्ष केंद्रीत करू इच्छिते. मी आता ऑफिसचे काम संपवून घरी परतते, आता माझे जीवन खूपच बदलले आहे. परंतु मला हे सगळे चांगले वाटत असल्याचे तिचे सांगणे आहे.