Ratnadurg Fort : रत्नदुर्ग किल्ल्यावर पुन्हा सापडले मंकला खेळाचे अवशेष
इतिहास संशोधक स्नेहल बने यांचा शोध, हनुमान मंदिरा शेजारी आढळून आला पटखेळ
रत्नागिरी : रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ला परिसरात पुन्हा एकदा नव्याने प्राचीन पटखेळ मंकलाचे अवशेष आढळून आले आहेत. इतिहास अभ्यासक स्नेहल सुभाष बने या मागील काही महिन्यापासून रत्नदुर्ग किल्ला परिसराचा अभ्यास करत आहेत. यादरम्यान त्यांना मंकला पटखेळाचे अवशेष दिसून आले होते. आता पुन्हा नव्याने प्राचीन बैठे म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंकला खळांचे अवशेष त्यांना दिसून आले आहेत. रत्नदुर्ग संशोधनात हा शोध महत्वाचा असल्याचे बने यांनी सांगितले आहे.
रत्नदुर्ग किल्ल्याचे तीन प्रमुख भाग आहेत. पहिला महादरवाजा, दुसरा दीपगृह परिसर व तिसरा भगवती मंदिर. किल्ल्यात महादरवाज्याच्यादिशेने प्रवेश केला असता हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराशेजारीच गडाचा महादरवाजा आहे. मंदिरा शेजारीच या प्राचीन पटखेळाचे अवशेष मिळाले आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा 24 पटांचा मंकला हा उभ्या रांगेत 12 पट आणि आडव्या रांगेत बारापट असे एकूण 24 पट, तसेच दुसऱ्या ठिकाणी 12 पटांचे आणखी दोन मंकला असे एकूण तीन मंकला पटखेळ 1 मे 2025 महाराष्ट्र दिन रोजी रत्नदुर्ग महादरवाजा पेठ किल्ला येथे आढळून आले.
मंकला हा खेळ विशेष करून आफ्रिकेत हा खेळ खूप प्रचलित आहे. दक्षिण आफ्रिकेत हा खेळ ‘बाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. जगभरात देखील हा खेळला जात होता या खेळाचे सुमारे 3500 वर्षापूर्वीचे संदर्भ आणि अवशेष इजिप्त मध्ये सापडलेले आहेत. पुरातन इजिप्त मध्ये लुकजर कारनक या वास्तूमध्ये या खेळाचे अवशेष पाहायला मिळतात.
स्थालांतराने याचा प्रसार आफ्रिका पासून मध्य आशिया व दक्षिण आशिया खंडात झाला. बाराव्या शतकात या खेळाचे दोनशे प्रकार अस्तित्वात होते. आफ्रिकन समुदायातील लोक व्यापार व दळणवळणाच्या निमित्ताने समुद्र आणि पठारी मार्गाने ज्या ठिकाणावरून गेली त्या त्या ठिकाणी त्यांनी या खेळाचा प्रसार केला.
भारत देशाने असेच काही खेळ आपलेसे केले आहे पण वेगवेगळ्या राज्यात या खेळाची वेगवेगळी नावे आहेत. जसे की अलीगुली माने, चिने माने, हरलुमाने, पिचकी माने, गोटू गुणी, पलंगुजी ही काही दक्षिणेतील नावे. सातगोल, सातगोटी, गोगलगाय ही या खेळाची काही मराठी- हिंदी नावे.
गुरुपल्याण हे या खेळाचे कोकणी नाव आहे. कोकण विभागात देखील ह्या खेळाचे अनेक ठिकाणी अवशेष सापडले आहेत. रायगडावर देखील या खेळाचे अवशेष मिळाले आहेत. मंकला हा खेळ एका आयताकृती फळीवर समोरासमोर पाच, सहा, सात खड्डे कोरलेल्या अशा पटावर खेळला जातो. प्रत्येक पटाच्या रकाण्यात पाच कवड्या असतात. हा खेळ काही प्रतिष्ठित लोकांकडे धातूमध्ये नक्षीकाम करून बनवलेला असे. खेळामध्ये सोंगट्यांचा वापर म्हणून कवड्या, रंगीत दगड, कडधान्य बिया अगदी रत्न देखील वापरली जात.
विविध लेणी समुदायात असे खेळ मोठ्या प्रमाणात कोरलेले मिळतात. महाराष्ट्रातील बऱ्याच लेण्यांमध्ये अशा अनेक प्रकारचे बैठे खेळांचे कोरीव प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये मंकलाचे अवशेष अधिक सापडतात. दक्षिण आफ्रिकेचा तर हा राष्ट्रीय बैठे खेळ आहे. वारी, मॅकोन, सोरो अशी काही विदेशी नावे देखील वेगवेगळ्या देशात प्रसिद्ध आहेत. आजच्या तांत्रिक उपकरणांच्या माध्यमातून नवनवीन खेळ खेळले जातात त्यामुळे अश्या प्राचीन बैठे खेळांचे मुळ अस्तित्व हरवून बसले आहे. या पुरातन खेळांचे अस्तित्व ओळखून या खेळांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.