द्विधा चित्रपटात मानसी कुलकर्णी
बापलेकीचं नातं शब्दांत व्यक्त करणे कठीण असतं. लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणारी लेक हे नात्याचं सर्वात सुंदर रुप असतं. ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बापलेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या भावना हळूवारपणे उलगडण्यात आल्या आहेत. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन नीलेश नाईक यांनी केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या दोघांसह चित्रपटामध्ये रेणुका दफ्तरदार, आस्ताद काळे, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर, ओवी तानवडे, निमिष कुलकर्णी आदी कलाकार आहेत.
नात्यात येणाऱ्या भावनिक संघर्षाची गोष्ट
‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात येणाऱ्या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात एखादी वेळच अशी येते की, मन द्विधा मनस्थितीत अडकते. ही भावना संवेदनशीलतेने पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिग्दर्शक नीलेश यांचे सांगणे आहे.
या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने माझ्याशी संपर्क साधला आणि माझ्या भूमिकेविषयी सविस्तर माहिती दिली. तेव्हा चित्रपटात दाखविण्यात आलेल्या फुफ्फुसांच्या आजाराबद्दल मला फारशी माहिती नवहती. मात्र दिग्दर्शकाने त्या आजाराचे बारकावे, त्या व्यक्तीची मानसिकता अतिशय समर्पकपणे समजावून सांगितली, त्यामुळे ही भूमिका अधिक वास्तवदर्शी दाखवता आली. मानसी आणि माझं ट्युनिंग उत्तम जुळून आलं. त्यामुळे पडद्यावर साकारलेले बापलेकीचे नातं अतिशय विश्वासार्ह वाटलं, कलाकार म्हणून संवेदनशील नात्याला न्याय देता आला याचा आनंद असल्याचे उद्गार सतीश पुळेकर यांनी काढले आहेत. ‘द्विधा’ हा चित्रपट 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.