मानस धामणे उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था, पुणे
येथे सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर महाराष्ट्र खुल्या 75 दर्जाच्या पुरूषांच्या टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्याच्या मानस धामणेने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
सदर स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडीच्या क्रीडा संकुलात खेळविली जात आहे. या स्पर्धेत बिगर मानांकीत टेनिसपटू क्रोएशियाचा डुजे अॅड्युकोव्हीक, ब्रिटनचा अॅलीस्टर ग्रे यांनीही एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरूष एकेरीच्या सामन्यात भारताचा वाईल्डकार्डधारक मानस धामणेने बेलारुसच्या इलिया इव्हासिकाचा 6-3 असा पराभव केला. दुखापतीमुळे बेलारुसच्या इव्हासिकाने स्पर्धेतून माघार घेतल्याने मानस उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला. आता त्याचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना क्रोएशियाच्या अॅड्युव कोव्हीकशी होणार आहे.
बिगर मानांकीत अॅड्यूव कोव्हिकने पोर्तुगालच्या पाचव्या मानांकीत फ्रेड्रिको सिल्वाचा 6-2, 6-2, ब्रिटनच्या अॅलिस्टर ग्रेने तृतीय मानांकीत इलिया सिमाकीनचा 4-6, 7-6 (7-5), 7-5 असा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. इटलीच्या सहाव्या मानांकीत सिनाने जपानच्या सिमीझुचा 6-1, 6-4 असा फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.