मना, चल नदीकिनारी...
नदीकाठी वसलेले गाव संस्कृतीसंपन्न आणि नदीसारखे प्रवाही, हसतेखेळते असते असा अनुभव आहे. गावाला वेढून असलेली कोणतीही नदी असो ती ‘गंगा’ असते. गावकऱ्यांचे नदीवर विलक्षण प्रेम असते. ती नदी म्हणजे त्यांचा मानसिक आधार असतो. नदीवर जाणे, नदीकाठी शांत बसून स्वत:च्या मनाचा अंदाज घेणे आणि मनातल्या सुखदु:खांच्या गोण्या रित्या करून झुळझुळते मन घेऊन घरी परत येणे हे सुख जाणत्यालाच कळते. पावसाळ्यात क्वचित ही नदी काळ होते. होते-नव्हते ते सारे वाहून नेते. तरीही गावातल्या लोकांची मने कडवट होत नाहीत. तिचे ते अस्ताव्यस्त रूप बघून ते समजून घेतात. तिची प्रार्थना करतात. ती शांत, सौम्य असावी म्हणून पूजा करतात.
नदीचे आणि स्त्राrचे नाते अनोखे आहे. घरकामाचे ओझे घेऊन नदीवर जाणारी लेक, सासुरवाशीण, माहेरवाशीण, प्रौढा कुणीही असो नदीवरून परतताना ती रिक्ता असते. कारण नदी तिचे गुज जाणून तिला दिलासा देते. भक्तविजय ग्रंथामध्ये परिसाभागवत या भक्ताची कथा आहे. पंढरपूरला राहणाऱ्या परिसा भागवताने रुक्मिणी मातेची अनुष्ठान करून आराधना केली तेव्हा तिने प्रसन्न होऊन एक परीस दिला. जेणेकरून परिसाचे मन भक्तीत रंगलेले असेल आणि पोटापाण्याची चिंता त्याला राहणार नाही. परिसाने तो परीस पत्नी कमलजा हिला देऊन ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस म्हणून बजावले. परंतु स्त्राrसुलभ स्वभावानुसार चंद्रभागेवर पाणी भरायला आलेल्या नामदेवांच्या पत्नीला म्हणजे राजाईला तिने परिसाचे गुपित सांगून टाकले. दोन दिवसांसाठी राजाईने तो परीस तिला उसना मागितला आणि घरी पक्वान्नांचा थाट उडवून दिला. संत नामदेवांना हे कसे आवडणार? त्यांनी तो परीस चंद्रभागेला अर्पण केला. परिसाच्या कुटुंबाला हे कळताच त्यांनी आकांत मांडला. संत नामदेव रोषाचे धनी झाले. तेव्हा चंद्रभागेत उडी टाकून त्यांनी ओंजळभर खडे आणले. ते सगळे परीस होते. परिसाभागवताची दृष्टी बदलून त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला दिव्य ज्ञान दिले. त्या क्षणांची चंद्रभागा साक्षी झाली. चंद्रभागेच्या तीरी साक्षात भू वैकुंठ आहे. संत एकनाथ महाराज ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगात म्हणतात, ‘माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा’. ही भीमा नदी सरळ वाहते आणि पंढरपुरी चंद्राकृती वळली की चंद्रभागा होते. ही भगवंताची शक्ती आहे. जिवाच्या वासना दूर करणारी प्रेमळ बहीण आहे. विठोबाची भक्तवत्सलता संत जनाबाई वर्णन करतात. एकदा जनाबाई न्हायला बसल्या तेव्हा विसाणाला पाणी नव्हते. त्यावेळी तिच्या मागे मागे चंद्रभागेवर घागर घेऊन पांडुरंग जातो. एका अभंगात त्या म्हणतात, ‘जनी जाय पाणियासी । मागे धावे हृषिकेशी । पाय भिजो नेदी हात । माथा घागरी वाहत?’ जनाबाईंचे धुणे चंद्रभागेवरून धुऊन आणतो असा विठोबा प्रेमळ आहे. नामदेव महाराज विठ्ठलाच्या आरतीत म्हणतात, ‘आषाढी-कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती । दर्शन हेळामात्रे । तया होय मुक्ती?’ प्रत्यक्ष परमात्मा जिथे नांदतो आहे तो भीमातीर धन्य आहे.
संतांचा रहिवास हा नदीच्या काठी आहे. नदीच्या तीरावर मनुष्य जीवाला अनाकलनीय असे चमत्कार घडले आहेत. नेवासे या गावी कपिलेश्वर देवालयात खांबाला टेकून श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. ती सच्चिदानंद बाबा थावरे यांनी लिहून घेतली. माऊली म्हणतात, ‘शके बाराशते बारोत्तरे। तै टीका केली ज्ञानेश्वरे । सच्चिदानंद बाबा आदरे। लेखकु जाहला?’ या सच्चिदानंद बाबांना या वाग्यज्ञासाठी माऊलींनी प्रवरा नदीतीरी जीवनदान दिले. सच्चिदानंद बाबांच्या कुडीतून प्राण पुढच्या प्रवासाला निघून गेले होते, तेव्हा त्यांच्या पत्नी सौदामिनी या सती जाण्यास निघाल्या. प्रवरामातेच्या तीरी एका वृक्षातळी माऊलींसह संत निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई बसले होते. सौदामिनीने तरुतळी ज्ञानेश्वर माऊलींना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा माऊलींनी अमृतमय आशीर्वाद दिला-‘अखंड सौभाग्यवती भव’! आपला आशीर्वाद पुढील जन्मी फळाला येणार असेल असे सौदामिनीने म्हणताच माऊली उठून सच्चिदानंद बाबांच्या निष्प्राण देहाजवळ गेले. संत दासगणू महाराजांनी सच्चिदानंद चरित्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, माऊली प्रेतरूपी सच्चिदानंदास म्हणाले, ‘उठ सच्चिदानंदा । या टाकून शीघ्र घोर निद्रेस । वेदा करी न खोटे ठायी । नच संभवे तुझा नाश’, असे म्हणून माऊलींनी प्रवरा नदीचे, अमृतवाहिनी असे जिला म्हणतात, तिचे जल हाती घेऊन त्या निष्प्राण देहावर शिंपडले आणि गाढ निद्रेतून जागे व्हावे तसे सच्चिदानंद उठून बसले. त्यानंतर ते घरी गेले नाहीत. माऊलींच्या वाणीतून अमृत स्रवू लागले आणि सच्चिदानंदांची लेखणी प्रवाही झाली. धन्य ती अमृतवाहिनी प्रवरामाता आणि धन्य ते सच्चिदानंद बाबा. माऊलींनी संजीवन समाधी इंद्रायणीकाठी घेतली, तर संत निवृत्तीनाथांनी गोदावरीतीरी त्र्यंबकेश्वरला. सोपानदेव सासवडला कऱ्हेतिरी समाधिस्थ झाले, तर योगिनी मुक्ताबाई तापीतिरी मुक्ताईनगरला.
गोदातीर धन्य झाला तो संत एकनाथ महाराजांच्या भगवत्सेवेने आणि प्रत्यक्ष परमात्म्याने नाथाघरी भरलेल्या पाण्यामुळे. आपले देवपण पांडुरंगाने टाकून दिले आणि तो श्री संत एकनाथांकडे सेवेकरी श्रीखंड्या झाला. सर्वांभूती भगवंत अनुभवणाऱ्या नाथांना पांडुरंगाची खरी ओळख पटली नाही. पांडुरंगाच्या मायेचे पटल होते म्हणूनच श्रीखंड्या नाथाघरी सेवा करू शकला. अन्यथा नाथांनी एक क्षणभरही देवाची सेवा घेतली नसती. देवाने गोदावरीच्या पाण्याने नाथांच्या घरचा रांजण रोज भरला. ज्याच्या चरणापासून भागीरथी प्रगट झाली त्याने पूजेसाठी, पिण्यासाठी नाथांघरी पाणी भरले. पांडुरंगाने आपले ऐश्वर्य विसरून नाथाघरी बारा वर्षे सेवा केली. खांद्यावर कावड घेऊन जाणाऱ्या श्रीखंड्या रूपात द्वारकेच्या भक्ताला दर्शन दिले आणि तो गुप्त झाला. प्रत्यक्ष भगवंताकडून घेतलेल्या सेवेमुळे नाथांच्या कोमल मनाला अतिशय दु:ख झाले तेव्हा चतुर्भुज श्रीकृष्ण रूपात पांडुरंग प्रकट झाला. श्रीखंड्या भरीत असलेला रांजण नाथषष्ठीच्या दिवशी देवाची घागर येऊन पडल्याशिवाय भरत नाही. संत निळोबाराय म्हणतात, ‘कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणि वाहे। अनन्य भक्तिभावे निळा वंदी त्याचे पाये’.. श्री एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी गोदावरी गंगेत स्नान केले. गोदामातेकडे तोंड करून ते पाटावर बसले आणि श्रीकृष्णरूपाचे ध्यान करीत देह विसर्जित केला.
धार्मिक पूजाविधीमध्ये कलशपूजा असते. घरी वापरत असलेले पाणी कलशात भरून त्यावर हात ठेवून मंत्र म्हणतात... ‘गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन संनिधीं कुरू’. या महत्त्वाच्या नद्यांचे पावित्र्य कलशात श्रद्धेमुळे उतरते त्याचप्रमाणे नदीतीरी तीर्थक्षेत्रावर मनात असूनही जाता येत नसले तरी मनात तो भाव आणून जाता येते. संत मीराबाई म्हणतात, ‘चालो मन गंगा जमुना तीर? गंगा जमुना निर्मल पानी । शितल होत सरीर?’ संतांच्या लीला आठवीत मनानेच नदीतीरी जाऊन स्नान करावे, दर्शन घ्यावे आणि तृप्त व्हावे.
-स्नेहा शिनखेडे