खुनी हल्ल्याचा प्रयत्न करणारा जेरबंद
केळघर :
कोंबड्यांच्या व्यवसायाच्या कारणावरून वाटंबे (ता. जावली) गावच्या हद्दीत केळघर घाटामध्ये दोघांवर कोयत्यासह लाकडी दांडक्याने वार झाल्याची घटना 11 जून रोजी घडली. या खुनी हल्ल्यात सिकंदर इस्माईल मोमीन, मुसा इस्माईल मोमीन (रा. चाफळ, ता. पाटण) हे दोघे जखमी झाले असून त्यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून विनोद रामचंद्र तुपे (रा. वडोली भिकेश्वर, ता. कराड) व त्याच्या साथीदारांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कोंबड्यांच्या व्यवसायावरून हल्ल्याचा हा प्रकार घडल्यानंतर गुह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मेढा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी संशयितांचा शोध सुरू केला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांना तात्काळ माहीती दिली. त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पोलिसांचे खास पोलीस पथक तयार करून गुह्यातील संशयितांचा शोध घेण्यास सुरवात केली. गुह्यातील मुख्य आरोपी विनोद रामचंद्र तुपे (रा. वडोली भिकेश्वर) याचा शोध घेत असताना तो त्याचा मित्र प्रफुल्ल मोहन पटेल (रा. वाघेरी) याच्या डोंगराकडेला असलेल्या शेतामधील पत्र्याचे शेडमध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यात तात्काळ खास पोलीस पथकामार्फत शिताफीने ताब्यात घेतले. तसेच त्याचा साथीदार गुह्यातील विधिसंघर्ष बालक हा सुद्धा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे.