मनुष्य स्वत:हूनच जीवनरूपी स्वप्नात गुंतत जातो
अध्याय सहावा
भगवंत म्हणाले, त्रिगुणांच्या पाशात अडकलेला, अज्ञानाने घेरलेला आत्मा आपण म्हणजे हा देह अशी समजूत करून घेतो. त्यातूनच मी कर्ता आहे हा विचार दृढ होतो. ह्यावर श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, आपण ‘माझा’ देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे, हे आपल्या हातात आहे का? ‘मी माझे रक्षण करीन’ असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी उचलून घरी आणावे लागते म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे! पण काही केल्या हे माणसाला पटत नाही. भगवंत पुढे म्हणाले, माणसाने आपले सध्याचे जीवन हे एक स्वप्न आहे हे लक्षात घेतले पाहिजे मग स्वप्नातील गोष्टी खऱ्या असतील का, ह्यावर त्याने विचार करायला हवा. मनुष्य स्वत:हूनच ह्या जीवनरूपी स्वप्नात गुंतत जातो हे माउली पोपटाच्या उदाहरणातून पटवून देतात. ते म्हणतात, पोपटाला धरण्याकरता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यावर त्याच्या वजनाने ती नलिका उलट बाजूला फिरते तेव्हा वास्तविक त्याने तेथून उडून जायला हवे, परंतु ही नळी सोडली तर आपण पडू व मरू अशी भीती त्याला वाटते. मग व्यर्थच तो मान इकडे तिकडे करतो व संकोचलेल्या छातीने नळीला चवड्यात घट्ट धरून रहातो. मनात म्हणतो की मी खरोखरच बांधला गेलो आहे. ह्या कल्पनेच्या खोड्यात अडकल्याने तो मोकळा असलेला त्याच्या पायाचा चवडा त्यात अधिकच गुंतवतो. त्याप्रमाणे संतानी कितीही जीव तोडून सांगितले तरी मनुष्य मी म्हणजे हा देह ही कल्पना घट्ट पकडून बसलेला असल्याने तो आपण देहापेक्षा वेगळे आहोत हे न मानता देहाभिमान वाढवत नेतो आणि आपला आपणच शत्रु होतो. ह्या आशयाचा जिंकुनी घेतला आत्मा बंधु तो होय आपुला।सोडीला तो जरी स्वैर शत्रुत्व करतो स्वये ।।6।। हा श्लोक आपण पहात आहोत. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, माणसाने मी कर्ता आहे हा अहंकारी विचार टाकावा आणि आपले स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे, म्हणजे आपण आपले कल्याण केल्यासारखे होईल. जो शरीराकडून आपल्याला सुख मिळेल अशी अपेक्षा ठेवतो, तो स्वत:चे नुकसान करून घेतो. ज्याप्रमाणे ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला आंधळेपणाचे डोहाळे लागून तो आपले डोळे आपणच झाकून घेतो आणि समोर आलेला सौख्यठेवा लाथाडतो त्याप्रमाणे माणसाची खरी ओळख आत्मस्वरूप आहे पण त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही त्यामुळे तो त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याउलट आपण म्हणजे हा देह नव्हे हे ज्याच्या लक्षात आलेले असते तो सद्गुरुंच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत करत आत्मज्ञानी होतो. त्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात आलेली असतात आणि निरिच्छता ही त्याची ओळख बनलेली असते. सदैव ईश्वराच्या स्मरणात मग्न असल्याने त्याला त्याच्या देहाचा अभिमान वाटत नाही. संत गोरा कुंभार ह्यांनी ही अवस्था अनुभवलेली होती. म्हणून ते म्हणतात,
तुला आठवावे गावे, हाच एक नेम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम ।
आयुष्य अशा पद्धतीने व्यतीत केल्यावर शेवटी काय होते ते सांगताना ते म्हणतात, तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा ।नाम तुझे घेतो गोरा, म्हणुनी आठवण।