For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनुष्याने प्रेमाच्या द्वेषाच्या अधीन होऊ नये

06:54 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनुष्याने प्रेमाच्या द्वेषाच्या अधीन होऊ नये
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे वागून स्वत:चे कल्याण करून घेणारे, त्यांच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष करून स्वत:चा नाश करून घेणारे असे माणसांचे दोन प्रकार असतात. माणसांचा आणखी एक प्रकार असतो तो असा, ह्या लोकांना असं वाटतं की, आपण धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आपल्याला चांगले काय आणि वाईट काय हे बरोबर समजते म्हणून आपण वागतोय ते योग्यच आहे असे त्यांना वाटत असते. मात्र वस्तुस्थिती अशी नसते. जोपर्यंत माणसाची देहबुद्धी शाबूत आहे तोपर्यंत त्याला मी कर्ता आहे असेच वाटत असते. मग तो कितीही शिकलेला असो. ज्याची देहबुद्धी शाबूत असते तो त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागत असतो.

स्वभावानुसार त्याच्या आवडीनिवडी ठरत असतात. हे स्पष्ट करताना भगवंत पुढील श्लोकात म्हणाले, प्रत्येकाचे विषयाविषयी अनुकूल-प्रतिकूल मत असते आणि त्यानुसार त्या विषयावर तो प्रेम करतो किंवा द्वेष करतो. म्हणून विषयांबद्दलच्या आवडी, निवडी परमार्थाच्या मार्गात विघ्न आणतात हे लक्षात घेऊन मनुष्याने राग द्वेषाच्या अधीन होऊ नये, त्यांना शरण जाऊ नये असं भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत.

Advertisement

इंद्रियी सेविता अर्थ राग-द्वेष उभे तिथे । वश होऊ नये त्यांस ते मार्गातील चोर चि ।। 34 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, इद्रियांच्या इच्छेप्रमाणे विषयांचे सेवन केले तर मनाला संतोष प्राप्त होतो हे खरे परंतु तो संतोष म्हणजे बाहेरून सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे. असा चोर गावाची सीमा पार करेपर्यंत गप्प असतो आणि गावाबाहेर पडल्यावर आपण एकटे आहोत हे पाहून आपला घात करून पैसे काढून घेतो. चोराच्या संगतीला माउली विषाची उपमा देऊन म्हणतात, बाबारे! विष वरून मधुर वाटेल, मनात ते प्राशन करण्याची इच्छा सुद्धा निर्माण होईल परंतु त्याच्या परिणामाचा विचार केला तर ते प्राणघातक आहे हे लक्षात येते किंवा गळाला लावलेले आमिष माशाला जसे भुलविते, त्याप्रमाणे इंद्रियांमुळे निर्माण होणारी विषयांची तीव्र लालसा मनुष्यास खोट्या सुखाच्या आशेकडे प्रवृत्त करत असते. ज्याप्रमाणे आमिषाखाली प्राण घेणारा गळ आहे, तो आपला नाश करेल, हे त्या माशाला तो गळ झाकलेला असल्यामुळे कळत नाही त्याप्रमाणे विषयांचे आकर्षण वाटू लागले, की मानवाला त्यामध्ये दडलेली घातक सुरी दिसत नाही. ज्याने विषयांची तीव्र इच्छा धरलेली असते त्याला ते पूर्ण व्हावेत अशी फार वाटत असते आणि ते मिळाले नाहीत तर त्याला राग अनावर होतो. कुशाग्र बुद्धीचा पारधी हा हरिणाचा घात करण्यासाठी त्याला चारी बाजूने घेरून हव्या त्या ठिकाणी बरोबर आणत असतो. त्याप्रमाणे माणसाची इंद्रिये त्याला घेरून त्याने विषयसुखाचा उपभोग घेऊन स्वत:चा घात करून घ्यावा अशी व्यवस्था करतात. म्हणून तू विषयांची संगती करू नकोस. पार्था! विषयांच्या मागे लागलास तर काम, क्रोध निर्माण होतात आणि हे दोन्ही परमार्थाच्या मार्गातील अडथळे आहेत हे लक्षात घेऊन विषयांच्या इच्छेला थाराच देऊ नये. त्यांची मनात आठवणही आणू नये. स्वधर्माची जाणीव कधीही नष्ट होऊ देऊ नये.

निरपेक्षपणे कर्म करण्याबद्दल सविस्तर सांगून झाल्यावर भगवंत पुढील श्लोकात वाट्याला आलेले कर्म करण्यातच माणसाचे भले कसे आहे ते सांगत आहेत. ते म्हणतात, पर धर्मापेक्षा, स्वधर्म दिसण्यास कमी प्रतीचा असला, तरी स्वधर्मच कल्याणप्रद होय. परधर्म हा भीतीदायक आहे, स्वधर्मात मरण आले तरी चांगले.

क्रमश:

Advertisement
Tags :

.