मनुष्याने वाईट कर्मापासून दूर जाऊन सत्कर्म केले पाहिजे-अॅड. ईश्वर घाडी
वार्ताहर/ जांबोटी
प्रत्येकाच्या अंगी निष्ठा व तपश्चर्या हवी तरच ते काम तडिस जाते. यासाठी प्रत्येक व्यक्तीने कामाची तपश्चर्या केली पाहिजे, मनुष्याच्या हातून चूक होते. म्हणून ते वाईट नव्हे, वाईटातूनही सत्कर्म घडते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महर्षी वाल्मिकी आहेत. पापाचे वाटेकरी आपले कुटुंबीय होत नाहीत असे समजताच वाल्याचे मन परिवर्तन झाले. त्याने रामनामाचा जप केला, त्या प्रेरणेमधूनच संपूर्ण जगाला आदर्श ठरलेल्या रामायणासारख्या महाकाव्याची निर्मिती झाली. महर्षी वाल्मिकी यांचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे सर्वांनी वाईट कर्मापासून दूर जाऊन सत्कर्म केले पाहिजे, असे प्रतिपादन खानापूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी यांनी केले. ते गुरुवारी आंबोळी येथे आयोजित वाल्मिकी जयंती कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी अर्जुन अपी नाईक हे होते.
वाल्मिकी संघाचे अध्यक्ष ओमानी नाईक बबन नाईक यांनी स्वागत केले. त्यानंतर जांबोटी जि.पं. विभागाचे माजी सदस्य जयराम देसाई, खानापूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी, ग्रा.पं. सदस्य लक्ष्मी नाईक आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच महर्षी वाल्मिकी व विविध देवदेवतांच्या प्रतिमांचे पूजनही करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नेते यशवंत बिर्जे, खानापूर तालुका ग्रा.पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, जयराम देसाई यांची महर्षी वाल्मिकी यांच्या जीवन चरित्राबद्दल माहिती देणारी भाषणे झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून सादिक बेळवडी, लक्ष्मी वाघुर्डीकर, माजी ग्रा.पं. सदस्य शंकर शास्त्राr, बबन पाटील, संजीव पाटील, मुख्याध्यापक एम. के. पाटील, रमेश नाईक, बाळू नाईक, बबन नाईक यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळू चोर्लेकर व आभार दीपक शास्त्राr यांनी मानले.