माणसाने समत्व बुद्धीने कर्म करावे
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, अर्जुना माणसाने फक्त कर्म करावे फळावर अधिकार सांगू नये पण फळाची इच्छाच करायची नाही तर कर्म तरी कशाला करा असा विचार मनात आणू नकोस कारण तू जरी स्वस्थ बसायचं ठरवलंस तरी तुझा त्रिगुणयुक्त स्वभाव तुला स्वस्थ बसू देणार नाही. वाट्याला आलेले कर्म आवडत नसेल तर दुसरे एखादे कर्म करू असे वाटेल पण तसे न करता मिळालेले कर्म कर्तव्य म्हणून, स्वधर्म म्हणून पार पाडावे. कर्माचे फळ काय द्यायचे ते ईश्वर ठरवत असतो. ईश्वर जे फळ देईल ते आनंदाने स्वीकारणे हेच हिताचे असते. मिळे तेचि करी गोड ही समाधानी राहण्याची गुरुकिल्ली आहे. काही लोक निषिद्ध म्हणजे करू नये ते कर्म करण्यात गुंतलेले असतात पण माणसाने तसे कधीही करू नये.
पुढे भगवंत सांगतात, फळ मिळो न मिळो तू समबुद्धीने कर्मे करत रहा हेच कर्मयोगाचे सार आहे.
फळ लाभो न लाभो तू नि:संग सम होऊनी । योग-युक्त करी कर्मे योग सार समत्व चि ।। 48।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, तू समतारुपी योगाने युक्त हो, फलाची इच्छा टाकून मन एकाग्र करून कर्मे कर, हेच तुझे कर्तव्य आहे. तुझ्या वाटणीला आलेले कर्मच तू करावेस अशी ईश्वराची अपेक्षा आहे. ईश्वर ते तुझ्याकडून त्याला हवे तसे आणि त्याला हवे तितकेच करून घेत असतो, त्यामुळे ते दैवयोगाने यथासांग पूर्ण झाले तरी विशेष संतोष मानू नकोस कारण तू कर्ता नसून ईश्वर कर्ता आहे. समजा काही कारणाने ते कर्म सिद्धीस गेले नाही, अर्धवट राहिले, तरी त्याबद्दल नाराज होऊ नकोस व मनाला त्रासही करून घेऊ नकोस.
व्यवहारातील एक उदाहरण पाहू. नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर मालक किंवा ऑफिसातील वरिष्ठ काय काम सांगतील त्याबद्दल कोणतीही तक्रार न करता, मनुष्य निमुटपणे करत असतो. कदाचित ते काम त्याला आवडत नसले तरी त्याबद्दल तो चकार शब्दही काढत नाही तसेच त्याने केलेल्या कामामुळे मालकाचा काय आणि किती फायदा झाला ह्याचाही तो विचार करत नाही. तो ज्या निर्विकारपणे नोकरीच्या ठिकाणी काम करतो त्याप्रमाणे आयुष्यात ईश्वराने दिलेली कर्मे काहीही किंतु परंतु मनात न आणता बिनबोभाट पार पाडण्यातच माणसाचे भले असते. काम केलं विषय संपला असा हा मामला असतो.
भगवंतानी कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नकोस हे जरी सांगितलं तरी त्याप्रमाणे माणसाच्या हातून लगेच घडतंच असं नाही कारण आत्तापर्यंत अहंकारामुळे मी कर्म करतोय मग मला फळ मिळालंच पाहिजे अशी अनेक जन्माची सवय लागलेली असते. त्यासाठी कर्म करून फळाची अपेक्षा करायची नाही हे मनावर सतत बिंबवावं लागतं. अशी सवय झाली की, हळूहळू फळाची अपेक्षा करायची नाही अशी मनाची तयारी होते आणि ती झाल्यावर, माणसाच्या स्वभावात बदल होऊन तो आपणहून निरपेक्षतेने कर्म करू लागतो. माणसाचा स्वभाव लवकर बदलत नाही हे लक्षात ठेवून निरपेक्षतेने कर्म करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. भगवंत पुढे सांगतात की, कर्म केल्यावर काही ना काही म्हणजे चांगले किंवा वाईट फळ हे मिळणारच आणि ते भोगण्यासाठी पुनर्जन्म होणार हे नक्की. ते टाळण्यासाठी माणसाने ईश्वराने जे काही फळ दिले आहे ते त्यालाच अर्पण करावे. कर्म ईश्वराला अर्पण करण्यामागे उद्दिष्ट असे की, मिळालेले फळ मी मिळवलंय असा अहंकार न होता तो त्या फळाचा मोकळेपणाने आनंद घेऊ शकतो. तसेच जर कर्म ईश्वर आपल्याकडून करून घेत आहे तर त्या कर्माचे फळही त्याचेच आहे ह्या भावनेने ते त्याला अर्पण केले की, मनुष्य त्या फळाच्या बंधनातून मुक्त होतो.
क्रमश: