Solapur Crime | सोलापुरात कारची काच फोडल्याच्या रागातून एकाचा खून
वाळूज नदीपात्रात मृतदेह आढळला; दोघांविरुद्ध खून गुन्हा नोंद
सोलापूर -चारचाकीची काच फोडल्याचा राग मनात धरून दोघा भावांनी मिळून एकास गंभीर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह वाळूज येथे सीना नदीपात्रात आढळला. या प्रकरणी दोघांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय भागवत जगझाप (रा. दहिटणे, ता. बार्शी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोमल विजय जगझाप (वय २७, रा. दहिटणे, ता. बार्शी) या महिलेच्या फिर्यादीवरुन दीपक कोळी, भुजंग कोळी, निर्मला कोळी (रा. दहिटणे, ता. बार्शी) यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील दहिटणे येथील मृत विजय जगझाप हे आई-वडील, पत्नी व दोन मुलांसह राहतात. त्यांची पत्नी मजुरीसाठी मुलांना घेऊन पुण्याला गेली होती. २१ फेब्रुवारी रोजी रात्री दीडच्या सुमारास गावातील दीपक कोळी व भुजंग कोळी यांच्या स्कार्पिओ गाडीची काच फोडण्यात आली होती. त्यानंतर कोळी बंधूनी विजयला काठीने जबर मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली.
त्यानंतर विजयचा भाऊ योगेश जगझाप यांनी दीपक व भुजंग या दोघांना तुमच्या गाडीचे नुकसान भरून देतो, असे सांगितले होते. विजयला समजावून सांगून एका खोलीत बसवून बाहेरून कडी लावली होती. त्यानंतर योगेशला झोप लागली. पहाटे तीनच्या सुमारास त्याला जाग आली पण विजय घरात नव्हता. त्याची सर्वत्र शोधाशोध केली. विजयाची पत्नी पुण्यावरून आली, त्यांनीही विजयचा शोध घेतला. दीपक व भुजंग यांच्याकडे चौकशी करण्यासाठी गेले. त्यांनी कोमल विजय जगझाप यांना जातिवाचक शिवीगाळ करून आमच्या गाडीची काच का फोडली, असा जाब विचारला. तसेच 'त्याला उद्याचा दिवस बघू देणार नाही अशी धमकी देऊन हाकलून दिले, असे फिर्यादीत नमूद आहे.
मृत विजय जगझापच्या कुटुंबीयांनी २२ फेब्रुवारी रोजी वैराग पोलीस ठाण्यात विजय जगझाप बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतरही तो मिळून आला नाही. मंगळवारी (ता. २४) अकराच्या सुमारास वि वाळूजजवळील नदी पात्रात विजय याचा मृतदेह मिळून आला. त्यामुळे कोळी यांच्याविरुध्द मोहोळ पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी व खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी सायकर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.