गळा आवळल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होताच 'ते' खाली कोसळले; गटारीच्या पाण्याच्या वादातून शेजाऱ्यानेच काढला काटा
हातकणंगले: गटारीच्या पाण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन हेरले (ता. हातकणंगले) येथे एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मनोहर आनंदा लोहार (वय ५७, रा. हेरले) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित आयुब रफिक लाटकर (वय ३५) हा घटनेनंतर स्वतःहून हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाला.
हेरले परिसरात बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मनोहर लोहार यांच्या घरासमोरील गटारीत पाणी साचले होते. लोहार हे गटारीतील पाणी बाजूला करत असताना शेजारी राहणाऱ्या आयुब लाटकर यांच्याशी त्यांचा वाद झाला. गटारीचे पाणी तुमच्यामुळे आमच्या घरात येते, असे म्हणत लाटकर यांनी लोहार यांच्या घराजवळ जाऊन त्यांच्याशी वाद घातल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली. या वादाचे रूपांतर झटापटीत झाले. लाटकर यांनी लोहार यांचा गळा आवळल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि ते खाली कोसळले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयित आयुब लाटकर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांकडून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली.