For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रम्प रिसॉर्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा खात्मा

06:22 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रम्प रिसॉर्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा खात्मा
Advertisement

बंदूक आणि इंधनाच्या डब्यासह प्रवेश करण्याचा प्रयत्न

Advertisement

वृत्तसंसा/ वॉशिंग्टन, डीसी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा खात्मा करण्यात आला आहे. संबंधित घुसखोर तरुणावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीबार केल्यानंतर तो जागीच ठार झाला. ही घटना रविवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 1:30 वाजता घडली. या घटनेच्यावेळी अध्यक्ष ट्रम्प वॉशिंग्टन, डीसी येथील व्हाईट हाऊसमध्ये होते.

Advertisement

घुसखोर इसम सुरक्षित क्षेत्रात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडे बंदूक आणि इंधनाचा डबा होता, असे ट्रम्प यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या गुप्त सेवा संस्थेने सांगितले. मृत व्यक्ती 20 वर्षांचा असून तो उत्तर कॅरोलिनाचा रहिवासी होता. त्याची ओळख अद्याप जाहीर झालेली नाही. त्याच्या ओळखीबाबत सखोल तपास सुरू आहे. सदर घुसखोर कोणत्या इराद्याने रिसॉर्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता, हे स्पष्टपणे करण्यात आलेले नाही. मात्र, त्याच्याकडे बंदूक आणि इंधनाचा डबा असल्यामुळे तो हल्ला किंवा जाळपोळ करण्याच्या उद्देशानेच घुसखोरी करण्याच्या पवित्र्यात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

गाडीच्या आडून आत जाण्याचा प्रयत्न

रिसॉर्टच्या नॉर्थ गेटमधून एक कार बाहेर पडत असताना त्या व्यक्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे बंदूक आणि इंधनाचा डबा होता. दोन गुप्तहेर सेवा एजंटांनी त्याला थांबवले आणि त्याला शस्त्र आणि कॅन खाली ठेवण्यास सांगितले. त्या तरुणाने कॅन खाली ठेवला, परंतु गोळीबार करण्याच्या स्थितीत बंदूक उचलली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीबार करताच तो ठार झाला, असे गुप्त सेवा अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, त्याच्या कुटुंबाने काही दिवसांपूर्वी तो बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. तो उत्तर कॅरोलिनाहून दक्षिणेकडे गेला होता आणि वाटेत एक बंदूक खरेदी केली होती, असे तपासात दिसून आले.

यापूर्वी निवडणूक रॅलीत ट्रम्प यांच्यावर गोळीबार

ट्रम्प यांच्या सुरक्षेत यापूर्वीही त्रुटी आढळल्या आहेत. 13 जुलै 2024 रोजी ट्रम्प यांच्यावर एका रॅलीदरम्यान एका हल्लेखोराने गोळीबार केला होता. त्यावेळी ते अध्यक्ष नव्हते. हा हल्ला राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या फक्त चार महिने आधी झाला होता. 20 वर्षीय हल्लेखोराने 400 फूट अंतरावरून ट्रम्प यांच्यावर असॉल्ट रायफलने गोळी झाडली. गोळी त्यांच्या कानाच्या बाजुला लागली होती. ट्रम्पच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या गुप्तहेर सेवा स्नायपर्सनी हल्लेखोराला ताबडतोब ठार मारले होते.

Advertisement
Tags :

.