For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीएसपी-पीएसआयच्या नावे डेथनोट लिहून एकाची आत्महत्या

12:57 PM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
डीएसपी पीएसआयच्या नावे डेथनोट लिहून एकाची आत्महत्या
Advertisement

घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ

Advertisement

बेळगाव : बेंडिगेरी (ता. गोकाक) येथील एका व्यक्तीने पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या नावे डेथनोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रवींद्र दानवगोळ असे त्याचे नाव असून या घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. परत दिलेले पैसे मागितल्यामुळे जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याने पोलिसात तक्रार केली होती. तरीदेखील धमक्या मिळाल्याने रवींद्रने गळफास घेतला आहे. रवींद्र याने दोघांना काही रक्कम कर्ज म्हणून दिली होती. मात्र कर्ज घेतलेल्या दोघांनीही पैसे परत केले नाहीत. उलट पैसे मागितल्याने रवींद्रला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे न्याय मिळावा यासाठी कुलगोडचे पोलीस उपनिरीक्षक आनंद आणि गोकाकचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक मुल्ला यांच्याकडे तक्रार केली होती.

पण पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. आत्महत्या करण्यापूर्वी रवींद्रने लिहिलेल्या डेथनोटमध्ये पोलिसांनी आपल्याला कर्जासाठी धमकी दिल्याचे नमूद केले आहे. घटना उघडकीस येताच मुडलगीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल ब्याकूड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर डेथनोट ताब्यात घेतली आहे. त्याचबरोबर त्याच्यावर 2024 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यानेही काही जणांवर फिर्याद दिली होती. मात्र आपण दिलेल्या तक्रारीतील सर्व संशयितांना पोलिसांनी अटक केली नाही, अशी खंत त्याला होती. अशा दोन्ही कारणांतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्राकडून समजली आहे.  या प्रकरणी कुलगोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.