अमेरिकेत हत्या केलेल्यास भारतात अटक
वृत्तसंस्था / चेन्नई
आपल्या तेलगु मैत्रिणीची अमेरिकेत हत्या करुन भारतात पळून आलेल्या आरोपीस तामिळनाडूमध्ये अटक करण्यात आली आहे. निकिता गुदीशाला असे हत्या झालेल्या युवतीचे नाव असून हत्येचा आरोप असणाऱ्याचे नाव अर्जुन शर्मा असे आहे. गुदीशाला ही शर्मा याची माजी मैत्रिण असल्याची माहिती देण्यात आली आहे. ती अमेरिकेत डाटा तज्ञ म्हणून काम करीत होती. तिची हत्या नववर्षाच्या पूवसंध्येला करण्यात आली होती. हत्या करुन शर्मा हा भारतात पळून आला होता. त्यामुळे इंटरपोलने त्याच्या विरोधात शोध अभियान चालविले होते. या अभियानाला सोमवारी यश आले. शर्मा याचा ठावठिकाणा तामिळनाडूत सापडला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अभियोग चालणार आहे.
अमेरिकेतील मेरीलँड कोलंबिया येथील शर्मा याच्या घरात गुदीशाला हिचा मृतदेह अमेरिकेच्या पोलिसांनी आढळून आला होता. तिच्या शरीरावर भोसकल्याच्या अनेक खुणा होत्या. अमेरिकन पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून शर्मा याचा शोध चालविला होता. हत्या केल्यानंतर तीन दिवसांनी शर्मा भारतात परतला होता. ही हत्या का करण्यात आली, हे अद्याप गूढ आहे. शर्मा याची चौकशी करण्यात आल्यानंतर हे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील पोलिसांनी शर्मा याच्या विरोधात इंटरपोल वॉरंट मिळविले आहे. आता शर्मा याला अमेरिकेच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता असून तेथे त्याच्यावर हत्येचा अभियोग चालविला जाणार, हे स्पष्ट आहे. या सर्व प्रकणात आरोपीचा शोध लावण्यात अमेरिकेतील भारताच्या राजदूतावासाची भूमिकाही महत्वाची राहिली.