ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा विनयभंग, तरुणाला अटक
महिला खेळाडूला अयोग्यरित्या स्पर्श : मध्यप्रदेशमधील घटना
वृत्तसंस्था/ इंदूर
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात सहभागी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील दोन क्रिकेटपटूंचा एका मोटारसायकलस्वाराने पाठलाग करून विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अकील खानला अटक केली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळानेही आपल्या दोन खेळाडूंबाबत अशी घटना घडल्याची पुष्टी केली आहे. तसेच शनिवारी मध्यप्रदेश पोलिसांनी अधिकृतपणे माहिती जारी केली.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंना अयोग्यरित्या स्पर्श करत एका मद्यपी तरुणाने लाजिरवाणे कृत्य केले आहे. आयसीसी महिला विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आलेल्या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये विनयभंग झाला. सदर महिला खेळाडू आपल्या हॉटेलमधून कॅफेकडे चालत जात जात असताना ही घटना घडल्यानंतर महिला क्रिकेटपटूंनी तात्काळ आपत्कालीन सूचना पाठवली. सुरक्षा अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ऑस्ट्रेलियन संघाचे सुरक्षा व्यवस्थापक डॅनी सिमन्स यांनी शुक्रवारी संध्याकाळी एमआयजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवत घटनेदरम्यान दुचाकीवरून आलेल्या आरोपी अकील खानला अटक केली.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाकडून दुजोरा
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) विनयभंगाच्या वृत्ताला दुजोरा देताना ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना मोटारसायकलस्वाराने ‘अयोग्यरित्या स्पर्श’ केल्याचे स्पष्ट केले. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत निवेदनही जारी केले आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त हिमानी मिश्रा यांनी दोन्ही खेळाडूंची भेट घेत त्यांचे जबाब नोंदवले आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 74 (महिलेच्या विनम्रतेचा अपमान करण्यासाठी गुन्हेगारी बळाचा वापर) आणि 78 (पाठलाग) अंतर्गत एफआयआर नोंदवला. याप्रकरणी शुक्रवारी खजराना रोड परिसरात घडलेल्या या घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. अकील खानवर यापूर्वीही गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले असून त्यांचा तपास सुरू आहे.