रिक्षातून अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याला अटक
रत्नागिरी :
शहरातील परटवणे तिठा येथे रिक्षामधून अवैधरित्या दारु वाहतूक करणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. अनिल विष्णू वालकर (३८, रा. मांडवी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ८७ हजार रुपयांचा मद्यसाठा व रिक्षा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली.
शहरातील साळवी स्टॉप ते परटवणे या मार्गावर रिक्षामधून अवैधरित्या दारुची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २ जून रोजी दुपारी पोलिसांकडून येथे संशयित हालचालींवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून लक्ष ठेवण्यात आले. दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास परटवणे नाका येथे एका रिक्षामधील (एमएच ०८ एक्यू ७८३) इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी मद्याच्या बाटल्यांचे बॉक्स आढळले.
पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी अनिल वालकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला.