देशी पिस्टलसह काडतुस बाळगणाऱ्यास अटक
मसूर :
कराड तालुक्यातील अंतवडी गावच्या हद्दीत मसूर ते शामगाव जाणाऱ्या रस्त्यावर वळणानजीक शामगाव घाट परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून देशी बनावटीच्या पिस्टलसह जिवंत काडतुस बेकायदेशीरित्या जवळ बाळगणाऱ्या युवकास रंगेहात पकडल्याची घटना सोमवारी 16 रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी व देशी बनावटीचे पिस्टल व काडतुस असा सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संदेश सतीश ताटे (वय 19, रा. पाटील चाळ, ओगलेवाडी, ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान सदर संशयित आरोपीस पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता 19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मसूर ते शामगाव घाट रस्त्यावर एक 18 ते 25 वयोगटातील इसम त्याची विना नंबरप्लेटची हिरो डिलक्स मोटारसायकलवरुन गावठी बनावटीचे पिस्टल सोबत घेऊन शामगाव बाजूकडे जाणार आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, हवालदार साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, सचिन साळुंखे, लक्ष्मण जगधने, सनी आवटे, मुनीर मुल्ला, राजू कांबळे, मनोज जाधव, धीरज महाडिक यांच्या पथकाला सूचना दिल्या. या पथकाने मसूर ते शामगाव रस्त्यावर सापळा रचला.
दुपारी पावणे दोनच्या 18 ते 25 वयोगटातील इसम विना नंबरप्लेटच्या हिरो होंडा डिलक्स मोटारसायकलवरून मसूरकडून शामगावकडे येताना दिसला. पथकातील पोलिसांनी त्यास थांबवून चौकशी केली. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. सपोनि सुधीर पाटील यांनी सदर पिस्टलच्या मॅग्झीनची तपासणी करुन बारकाईने पाहणी केली असता त्यामध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले. मोटार सायकलला नंबरप्लेट नसलेचे आढळले. चौकशीत त्याने वाहनाचा नंबर एम एच 50 एच 4890 असा असल्याचे सांगून ती मित्र तेजस गुरव याची असल्याचे सांगितले.
पिस्टल घेऊन जात असताना कोणी ओळखू नये म्हणून मोटार सायकलच्या नंबरप्लेट काढलेल्या असल्याचे संशयित आरोपीने सांगितले. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. हवालदार धीरज नारायण महाडिक यांनी मसूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास मसूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि खरात करत आहेत..