प्रेयसीला भेटण्यासाठी बोलावून घेतले, तिने लग्न जमल्याचे सांगितले आणि म्हणाली यापुढे....; संतापलेल्या प्रियकराने तिला कड्यावरून ढकलून देत केला प्रेमाचा शेवट
पाटगाव (कोल्हापूर): लग्न ठरल्यानंतर प्रेमसंबंध पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून २३ वर्षीय तरुणीला कड्यावरून ढकलून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी येथे उघडकीस आली आहे. तरन्नुम बशीर नाईक (वय २३, मूळ रा. पाटगाव, सध्या रा. गारगोटी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी श्रीपाद दिनकर वडर (वय २५, रा. अवधूत कॉलनी, गारगोटी) याला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणी बेपत्ता झाल्याचा बनाव केल्याचा संशय असून, पुढील तपासात या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी अकराच्या सुमारास श्रीपादने तरन्नुमला नाईकवाडी येथील कड्यावर बोलावून घेतले. त्यावेळी तरन्नुमने लग्न ठरल्याचे सांगत यापुढे प्रेमसंबंध सुरू ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर श्रीपादने तिला कड्यावरून खाली ढकलले. या घटनेत तरन्नुमचा मृत्यू झाला. घटनेनंतर तरुणी बेपत्ता झाल्याचा बनाव करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असता संशय निर्माण झाला. त्यानंतर शनिवारी (१० ऑक्टोबर) सायंकाळी श्रीपादला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास सुरू आहे.
साडेतीन तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर
कड्याखालील खोल दरीत पडलेल्या तरुणीचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी आंबोली येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले होते. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी शोधमोहीम सुरू केली. सुमारे ३५० ते ४०० फूट खोल दरीत उतरून दुर्गम परिसरात शोध घेण्यात आला. कठीण भौगोलिक परिस्थिती आणि बचावकार्यातील अडचणींवर मात करत सुमारे साडेतीन तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी तीनच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. या शोधमोहिमेत पोलीस निरीक्षक संदीप जगताप, उपनिरीक्षक अली मुल्ला, आमिर नदाफ, स्वप्नील मोरे, तानाजी डवरी, विकास कांबळे, शीतल पाडेकर यांच्यासह आंबोली रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी सहभाग घेतला. या घटनेमुळे गारगोटीसह भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
