'माझ्या कामात अडथळा करतोस" म्हणत थेट महसूल सेवकाच्या डोक्यात घातले हेल्मेट
पन्हाळा : पीक पाहणी नोंदणीतील नोंदीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट मारहाणीत झाले. कोलोली (ता. पन्हाळा) येथील तलाठी कार्यालयात शासकीय काम करीत असलेल्या महसूल सेवकाची कॉलर पकडून शिवीगाळ करत डोक्यात हेल्मेट मारल्याची घटना बुधवारी (दि. २३) सायंकाळी घडली. याप्रकरणी कृष्णात बाबुराव पाटील (वय ३८, रा. कोलोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धोंडीराम विष्णू पाटील (रा. कोतोली, ता. पन्हाळा) याच्यावर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, कृष्णात पाटील हे कोलोली ग्रामपंचायतीचे महसूल सेवक असून, बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते पीक पाहणी नोंदणीची माहिती तलाठ्यांना देत होते. त्याचवेळी धोंडीराम पाटील तेथे आला. तेलवे गावातील पीक पाहणी नोंदणीमध्ये ओढ्याची नोंद करण्याच्या कारणावरून त्याने पाटील यांच्याशी वाद घातला. 'माझ्या कामात अडथळा करतोस" असे म्हणत आरोपीने पाटील यांची शर्टची कॉलर पकडली. त्यानंतर शिवीगाळ करत हातातील हेल्मेटने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. या घटनेत पाटील जखमी झाले.
शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाव्यास कामापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने मारहाण व अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर पन्हाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक एन.आर. चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा पोलीस करीत आहेत.