For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ममतांचे ‘एकला चलो रे’

06:55 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
ममतांचे ‘एकला चलो रे’
Advertisement

पश्चिम बंगालमधील सर्व 42 जागांवर उतरवले उमेदवार, नुसरत जहाँ ‘आऊट’, युसूफ पठाण ‘इन’, 26 नवे चेहरे

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी रविवारी मोठी घोषणा केली. बंगालमध्ये टीएमसी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे ममतांनी जाहीर केले. या यादीमुळे तृणमूल पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससोबत युती करणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पक्षाने सर्व 42 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या यादीत माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणसह किर्ती आझाद यांचेही नाव आहे. बहरामपूरमधून अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात युसूफ पठाण यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.

Advertisement

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसने रविवारी लोकसभा निवडणूक 2024 साठी राज्यातील सर्व 42 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवरून मुख्यमंत्री आणि टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून टीएमसी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून शाब्दिक युद्ध सुरू होते. जागावाटपाच्या बैठकांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले नाही. ममता बॅनर्जी यांची काँग्रेसला फक्त 2 जागा देण्याची तयारी होती, तर काँग्रेस 10-12 जागांची मागणी करत होती.

ममता बॅनर्जी यांनी माजी खासदार महुआ मोईत्रा यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. महुआ मोईत्रा व्यतिरिक्त टीएमसीच्या यादीत पक्षाने टीम इंडियासाठी क्रिकेट खेळलेल्या युसूफ पठाणवरही बाजी लावली आहे, तर अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनाही संधी देण्यात आली आहे. शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोलमधून विद्यमान खासदार आहेत.

अर्जुन सिंग आणि नुसरत जहाँचे तिकीट रद्द

तृणमूल काँग्रेसने ज्या जागांसाठी नावांची घोषणा केली आहे त्यात अनेक बड्या नावांचाही समावेश आहे. बरकपूर मतदारसंघातून अर्जुन सिंग यांचे तिकीट पक्षाने रद्द केले आहे. तसेच पक्षाने नुसरत जहाँ यांना ‘आऊट’ केले आहे. हाजी नुऊल इस्लाम यांना नुसरत जहाँच्या लोकसभा मतदारसंघातून बसीरहाटमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांना वर्धमान-दुर्गापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. डायमंड हार्बरमधून अभिषेक बॅनर्जी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

पहिल्यांदाच जाहीर सभेत उमेदवारांची घोषणा

तृणमूल काँग्रेसच्या यंदाच्या उमेदवार यादीत अनेक नवी नावे आहेत. आतापर्यंत निवडणुकीच्या घोषणेच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तृणमूल काँग्रेस कालीघाट येथील तृणमूल कार्यालयातून उमेदवारांची नावे जाहीर करायचे. पण यावेळी अपवाद ठरला आहे. अभूतपूर्व पद्धतीने ममतांनी ब्रिगेड रॅलीच्या मंचावरून उमेदवारांची नावे जाहीर केली. इतकेच नव्हे तर तृणमूलने राज्यातील सर्व 42 मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करत ‘इंडिया’ला धक्का दिला. यावरून एक गोष्ट नक्की झाली आहे की, आता राज्यात काँग्रेससोबत युती होण्याची शक्यता नाही. राज्यात तृणमूल एकट्याने निवडणूक लढवणार आहे.

तृणमूलच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद

ममता बॅनर्जी यांनी रविवारी कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिगेड परेड ग्राऊंडवर एका सभेला संबोधित करताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ब्रिटीश वसाहत काळात परेड ग्राउंड म्हणून प्रस्थापित झालेल्या या ऐतिहासिक मैदानावर तृणमूल काँग्रेसची भव्य रॅली महत्त्वाची ठरली. जानेवारी 2019 मध्ये झालेल्या सभेनंतर या मैदानावर पक्षाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिली रॅली आहे. 2019 मध्ये झालेल्या बैठकीत 19 विरोधी पक्षांचे नेते एकता दाखवत एकत्र आले होते. तळागाळात मजबूत संघटना असूनही, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या जागांची संख्या 34 वरून 22 पर्यंत घसरली, तर भारतीय जनता पक्षाने चमकदार कामगिरी करत राज्यात 18 जागा जिंकल्या होत्या.

युसूफ पठाण ‘लोकसभे’च्या मैदानात, अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात लढणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या यादीत माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणच्या नावाचाही समावेश आहे. युसूफ पठाण बहरामपूरमधून निवडणूक लढवणार आहे. युसूफ पठाण यांचा सामना काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. त्याचबरोबर टीएमसीने डायमंड हार्बरमधून अभिषेक बॅनर्जी यांना तिकीट दिले आहे. मिमी चक्रवर्तीच्या जागी अभिनेत्री सयोनी घोषला जाधवपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. महुआ मोईत्रा यांना कृष्णानगरमधून तर शताब्दी रॉय यांना बीरभूममधून उमेदवारी मिळाली आहे. माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांना तिकीट देण्यात आले आहे. तर अभिनेत्री रचना बॅनर्जी यांना हुगळीतून रिंगणात उतरवण्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली.

Advertisement
Tags :

.