ममता सरकार आणणार बलात्कारविरोधी कायदा
पश्चिम बंगाल विधानसभेचे आजपासून विशेष अधिवेशन : भाजपचाही पाठिंबा
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकात्याच्या आरजी कर हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाबाबत ममता सरकार कठोर पवित्र्यात आहे. राज्य सरकारच्या विरोधात सातत्याने आंदोलने होत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये राज्य सरकारने सोमवारी राज्य विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. या विशेष अधिवेशनात बलात्कारविरोधी विधेयक मांडले जाणार असून त्यात बलात्कार प्रकरणातील दोषींना 10 दिवसांच्या आत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे विशेष अधिवेशन सोमवारी सुरू होणार असून हे विधेयक मंगळवारी मांडले जाण्याची शक्मयता आहे. ममतांच्या या पावलाला मुख्य विरोधी पक्ष भाजपही विधानसभेत पाठिंबा देणार असल्याचे समजते.
पश्चिम बंगाल सरकारच्या बलात्काराविरोधातील विधेयकाला भाजपचे आमदार पाठिंबा देतील, असे भाजपने म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्या विधेयकाला सरकार पाठिंबा देईल असे सांगतानाच ममता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे आमदार सक्रीय आंदोलन करतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी रविवारी सांगितले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापना दिनी पुढील आठवड्यात बंगाल विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून हे विधेयक मंजूर केले जाईल, असे जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर काही तासांनी सायंकाळी राज्य सचिवालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली.