ममता बॅनर्जींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट
‘एसआयआर’संबंधी विचारणा : गैरवर्तणुकीचा आरोप, एकमेकांवर टीका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर एसआयआरसंबंधात तीव्र टीका केली आहे. आयोगानेही या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी सोमवारी आपल्या शिष्टमंडळासह ही भेट घेतली. त्यांनी मतदारसूची पुनर्सर्वेक्षण प्रक्रियेला आक्षेप घेतला असून मुख्य निवडणूक आयुक्तांवर अनेक आरोप केले. परंतु, आयोगाने हे सर्व आरोप फेटाळताना ममता बॅनर्जी यांना स्पष्टपणे उत्तरे दिली. आता ममता बॅनर्जी पुन्हा कोलकत्याला परतणार असल्याची माहिती तृणमूल काँग्रेसकडून देण्यात आली.
सोमवारी दुपारी बॅनर्जी यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन ज्ञानेश कुमार यांच्याकडे त्यांचे आक्षेप नोंदविले. त्यांचा प्रत्येक आरोप धादांत खोटा आणि बिनबुडाचा होता. त्यांनी बोलताना सभ्यतेचे संकेतही पाळले नाहीत. त्यांनी टेबलावर हात आपटला आणि आरडाओरडा केला, असे प्रतिपादन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केले.
आयोगाकडून उत्तर
ममता बॅनर्जी यांच्या प्रत्येक आरोपाला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी योग्य शब्दांमध्ये उत्तरे दिली. त्यांनी संपूर्ण मतदारसूची पुनर्सर्वेक्षण प्रक्रिया त्यांना समजून देण्याचा प्रयत्न केला. आयोगाने आतापर्यंत पेलेली प्रत्येक कृती पूर्णपणे कायद्याच्या कक्षेत राहूनच केली आहे. तसेच यापुढेही प्रत्येक कृती अशीच कायदेसंमत पद्धतीनेच होईल, असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला. पण ममता बॅनर्जी त्यांचे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नेत्यांचे असभ्य भाषेत आरोप
तृणमूल काँग्रेसचे अनेक आमदार आणि नेतेही केंद्रीय निवडणूक आयोगासंबंधात अत्यंत असभ्य भाषा करीत आहेत. त्यांची टीका पूर्णत: बिनबुडाची आहे. ते केवळ वातावरण निर्मिती करुन जनतेचा आयोगावरचा विश्वास ढासळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, याची जाणीव बॅनर्जी यांना करुन देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये एसआयआरचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे आणि त्यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावण्याचे आणि ही कागदपत्रे जाळण्याचे प्रकारही घडले आहेत. या प्रक्रियेत ज्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, त्यांना संरक्षण देण्याचे उत्तरदायित्व राज्य सरकारचे आहे. तसेच, या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे काम सुरक्षितपणे आणि सुरळीतपणे करता येईल, असे वातावरण निर्माण करण्याचे उत्तरदायित्वही राज्य सरकारचे आहे, याची जाणीव मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बॅनर्जी यांना करुन दिली, असेही प्रतिपादन सूत्रांकडून केले गेले.
आयोगाच्या आदेशाचा भंग
पश्चिम बंगालमधील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने तेथील राज्य सरकारला दिला होता. तथापि, तो आजही लागू करण्यात आलेला नाही. तसेच, राज्य सरकार आयोगाला या महत्वाच्या कामात सहकार्य करण्यास टाळाटाळ करीत आहे, असेही आयोगाकडून स्पष्ट केले गेले.