ममता बॅनर्जींना काँग्रेस, डाव्यांकडून झटका
भाजपविरोधात एकत्र येण्यास नकार
वृत्तसंस्था, कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षांनी सत्ता गमाविणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधात विरोधी पक्षांच्या एकतेचे आवाहन केले होते. परंतु आता त्यांच्या या आवाहनाला काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी फेटाळले आहे. गुन्हेगारी, खंडणीवसुली आणि भ्रष्ट असलेल्या पक्षासोबत जाणार नसल्याचे माकपने स्पष्ट केले आहे. तर अतिजहाल डाव्यांसोबत जाण्याच्या ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे.
ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय पक्ष, काँग्रेस आणि डावे तसेच अतिजहाल डाव्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, अतिजहाल डाव्यांचा ममता बॅनर्जींना अपेक्षित अर्थ माओवादी आहे का? माओवाद्यांनी 25 मे 2013 रोजी छत्तीसगडमध्ये 18 काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या केली होती असे पश्चिम बंगाल काँग्रेसचे पवक्ते सौम्य आइच राय यांनी म्हटले आहे.
माकपचाही नकार
माकपचे सचिव मोहम्मद सलीम यांनीही ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावाला पूर्णपणे फेटाळले आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आम्ही कदापिही जाणार नाही. आम्ही गुन्हेगार, खंडणीवसुली करणाऱ्या भ्रष्ट आणि सांप्रदायिक व्यक्तीला स्वीकार करणार नाही. आम्ही जनता आणि वंचित लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करू असे त्यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जींचे आवाहन
स्वत:चे पूर्ण राजकारण काँग्रेस आणि डाव्यांच्या विरोधात उभे करणाऱ्या ममता बॅनर्जी याच्याच जोरावर बंगालमध्ये 15 वर्षांपर्यंत सरकार चालविले. ममता बॅनर्जीच्या शासनकाळात तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात डाव्या पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांना जीव गमवावा लागला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी या सर्व पक्षांना भाजपविरोधात एकजूट होण्याचे आवाहन केले.