ममता बॅनर्जींना नाही दिल्ली पोलिसांवर विश्वास
वंग भवनाच्या सुरक्षेसाठी कोलकात्यातून सुरक्षा पथक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील पश्चिम बंगालचे गेस्ट हाउस ‘वंग भवन’बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवत अतिरिक्त दल तैनात करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधून 22 सदस्यीय एक विशेष पथक सोमवारी रात्री विमानाने दिल्लीत पोहोचले, ज्याला त्वरित गेस्ट हाउसच्या सुरक्षेकरता तैनात करण्यात आले आहे. वंग भवनमध्ये येणाऱ्या तसेच जाणाऱ्या लोकांवर आता करडी नजर ठेवली जात आहे. हे पाऊल पश्चिम बंगालच्या अधिकृत गेस्ट हाउसांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उचलण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या या वाढत्या स्तरामागील कारणांचा खुलासा केलेला नाही. परंतु 22 सुरक्षा कर्मचाऱ्यांची ही तुकडी आता दिल्लीत बंगालच्या अतिथींच्या वास्तव्यस्थानांची देखरेख करणार आहे. सध्या वंग भवनाचे मुख्य प्रवेशद्वार आणि आसपास दिल्ली पोलीसही तैनात आहेत.
बंगालींना धमकाविले जातेय
दिल्लीत राहण्यासाठी आलेल्या बंगालच्या लोकांना दिल्लीचे पोलीस घाबरवत अन् धमकावित असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केला होता. तसेच ममता बॅनर्जी यांनी वंग भवनाबाहेर तैनात दिल्ली पोलिसांसोबत हुज्जतही घातली होती. दिल्ली पोलिसांना तैनात करत भीती निर्माण करणे आणि वाहतूक रोखली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.
ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वात पक्षाचे एक शिष्टमंडळ एसआयआर प्रक्रियेतील त्रुटींच्या यादीसोबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना भेटण्यासाठी सोमवारी नवी दिल्लीत पोहोचले होते.
या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी दिल्लीतील वंग भवनाचा दौरा करत बंगालच्या लोकांना दिल्ली पोलीस घाबरवत असल्याचा आरोप केला होता. एसआयआर प्रक्रियेमुळे प्रभावित परिवारंना न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीत आणले गेले होते आणि आता त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. दिल्ली पोलीस बंगालच्या लोकांचा छळ करत आहेत असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला होता.